आठव्‍या ग्‍लोबल महोत्सवात घ्या कोकणाची अनुभूती!

सोमवार, 10 डिसेंबर 2018

मुंबई - कोकण म्हणजे निसर्गाने सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या भूमीत भटकंतीबरोबरच विटीदांडू, लगोरीसारख्या खेळांमध्ये रमण्याची संधी कोकण भूमी प्रतिष्ठानने दिली आहे. त्यांच्या २२ ते ३१ डिसेंबरमध्ये अर्नाळा येथे होणाऱ्या आठव्या ग्लोबल कोकण महोत्सवांतर्गत पहिला "व्हिलेज टुरिझम'मध्ये ही संधी मिळणार आहे. त्यानंतर नवीन वर्षात आंबिवली (पालघर), ऐनशेत (वाडा) आणि चौल (अलिबाग) येथे असे उत्सव होणार आहेत. 

विरारजवळील अर्नाळा गावात "व्हिलेज टुरिझम फेस्टिव्हल'ची सुरुवात होणार आहे. या ठिकाणी पर्यटक ग्रामीण जीवनाचा अनुभव घेऊ शकतील. खेड्यांतील जीवन अनुभवण्याची संधी हे त्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे. खाद्यसंस्कृतीतही कोकण समृद्ध आहे. महोत्सवात ते खाद्यपदार्थही मनसोक्त मिळणार आहेत. निसर्ग-जंगल भ्रमंती, बैलगाडीतून गावाचा फेरफटका, नदीत डुंबणे यांच्याबरोबरच भाषा, परंपरा, लोककला यांची माहितीही घेता येणार आहे. आबाधुबी, लगोरी, विटीदांडू, भोवरा अशा अस्सल ग्रामीण खेळांचा आनंद घेता येईल. गावप्रमुखाबरोबर गप्पा, ग्रामीण अर्थव्यवस्था समजून घेणे, ग्रामदैवत भेट अशीही या महोत्सवाची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे महोत्सव पर्वणी ठरणार असल्याचा दावा आयोजक करत आहेत. 

जगभर प्रसिद्ध असलेला एअर स्पोर्टस्‌ पर्यटन हे अर्नाळा किनाऱ्यावर महोत्सवातून सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये पर्यटक पॅरा मोटारिंगचा आनंद घेऊ शकतात. नवीन वर्षांत आंबिवली (पालघर), ऐनशेत (वाडा), चौल (अलिबाग) येथे असे उत्सव होणार आहेत. महोत्सवाचे आयोजन कोकणातील व्यवसाय आणि व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने केले आहे, असे या महोत्सवाचे आयोजक संजय यादवराव यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी संपर्क ः ०२२-२४३२४२६०. 

शेती पर्यटन केंद्र विकसित 
अर्नाळा येथे मामाची वाडी नावाचे शेती पर्यटन केंद्र विकसित करण्यात आले आहे. सोनचाफा, मोगरा, लिली, झेंडू, गुलाब आदी फुलांची बाग या ठिकाणी पाहायला मिळेल.