मच्छीमारांचे दिवाळे, खवय्यांची पंचाईत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

वसई ः अवकाळी पाऊस, वादळ अशा दुहेरी संकटात वसईतील मच्छीमार सापडला असून यामुळे माशांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे उत्पन्नच थांबल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, बोटीचे कर्ज, खर्च कसा करायचा या कात्रीत मच्छीमार सापडला आहे. दुसरीकडे मासेच नसल्यामुळे मासळी बाजार ओस पडला असून यामुळे खवय्यांचीदेखील पंचाईत झाली आहे.

वसई ः अवकाळी पाऊस, वादळ अशा दुहेरी संकटात वसईतील मच्छीमार सापडला असून यामुळे माशांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे उत्पन्नच थांबल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह, बोटीचे कर्ज, खर्च कसा करायचा या कात्रीत मच्छीमार सापडला आहे. दुसरीकडे मासेच नसल्यामुळे मासळी बाजार ओस पडला असून यामुळे खवय्यांचीदेखील पंचाईत झाली आहे.

पापलेट, मुशी, सुरमई, बोंबील, कोलंबी, पाकवट, वाघूळ हलवा, घोळ, दाढा, रावस असे मासे जाळ्यात अडकवण्यासाठी मच्छीमार खोल समुद्रात जातात; परंतु सध्या माशांची आवक कमी झाली आहे. याचा परिणाम मांसाहारी खवय्यांसह, हॉटेल व्यवसाय व छोटे-मोठे मच्छीविक्रेते यांच्यावर झाला आहे. जे मासे बाजारात येत आहेत, त्यांचे भावदेखील वाढले आहेत. सुकी मासळीदेखील दिसेनाशी झाली आहे. समुद्रकिनारी, गावात सुके मासे खराब झाल्याने लाखोंचे नुकसान आणि परिश्रम वाया गेल्याने मच्छीमार हताश झाला आहे.

नैसर्गिक आपत्तीत आम्हाला कोण तारणार, असा प्रश्‍न आता त्यांच्यासमोर आहे. नुकसानभरपाईसाठी पंचनामा करावा आणि सरकारने आम्हाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी अर्नाळा येथील मच्छीमार करीत आहेत. सद्यस्थितीत समुद्रात जाणाऱ्या बोटी किनाऱ्याला लागून असल्याने मासेमारी ठप्प झाली आहे. अर्नाळा, वसईमधील मासळी बाजारात मंडईत खूप कमी प्रमाणात मासेविक्रेत्या महिला दिसत आहेत; तर समुद्र कधी शांत होईल, अवकाळी पाऊस संकट कधी संपेल, याची प्रतीक्षा मच्छीमार करत आहेत. 

छोटे मासे दुर्मीळ 
बोंबील, वाघूळ,  पाकवट (स्टिंग रे) हे मासे दुर्मीळ झाले आहेत. ते समुद्रात दिसत नाहीत, तर पापलेट, सुरमईचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. छोटे मासे जाळ्याला लागत आहेत; परंतु त्यांची संख्या कमीच आहे. याचा परिणाम व्यवसायावर होत आहे, असे अर्नाळा येथील नागरिक निनाद पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fish market dew due to decrease in arrival of fish in Vasai