चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे दिवाळे!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

क्‍यार, महा आणि आता पवन... एकामागोमाग एक निर्माण होणाऱ्या या चक्रीवादळांनी नवी मुंबईतील मच्छीमारांना जेरीस आणले आहे. क्‍यार, महा चक्रीवादलांमुळे नौका, जाळ्यांचे लाखोंच्या घरात नुकसान झाल्याने ‘पवन’च्या भीतीने दिवाळे, सारसोळेतील जेट्टीवर मच्छीमारांनी बोटी नांगरल्या आहेत.

नवी मुंबई : क्‍यार, महा आणि आता पवन... एकामागोमाग एक निर्माण होणाऱ्या या चक्रीवादळांनी नवी मुंबईतील मच्छीमारांना जेरीस आणले आहे. क्‍यार, महा चक्रीवादलांमुळे नौका, जाळ्यांचे लाखोंच्या घरात नुकसान झाल्याने ‘पवन’च्या भीतीने दिवाळे, सारसोळेतील जेट्टीवर मच्छीमारांनी बोटी नांगरल्या आहेत.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ‘पवन’ चक्रीवादळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. याआधीच मे महिन्यातही मासेमारी काही काळ बंद ठेवावी लागली होती. त्यानंतर पावसाळ्याच्या दिवसांत येणारी सक्तीची विश्रांती आणि ऑक्‍टोबर, नोव्हेंबरच्या कालावधीत पुन्हा चक्रीवादलाने डोके वर काढल्याने आठवडाभर नौका बंदरात उभ्या राहिल्याने इथल्या मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. दिवाळे कोळीवाडा ग्रामस्थ युवा सामाजिक संस्थेचे भूषण कोळी यांनी सांगितले की, विमानतळासाठी होणारा भराव, बेलापूर कॉलनीतून सोडलेले सिवरेंज, तळोजाकडून येणारे प्रदूषण अशा तिहेरी कोंडीत दिवाळे गावचा मच्छीमार अडकला आहे. जलप्रदूषणामुळे गावाजवळच्या खाडीतले मासे कधीच नाहीसे झाले. त्यामुळे इथल्या नौका, ट्राली घेऊन मच्छीमार घरापुरीच्या पुढे खोल समुद्रात जातात; मात्र चक्रीवादळाची सूचना मिळाली की जवळच्या बंदरात त्यांना आपल्या नौका उभ्या कराव्या लागतात. वादळांमुळे अनेकांच्या जाळ्या खराब झाल्या आहेत. एका जाळीची किंमत जवळपास ५० हजार आहे. त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे; तर लांबलेला पाऊस, वादळ, यामुळे मच्छीमारांना गेले सहा महिने मासेमारीसाठी फार कमी दिवस मिळाले. त्यामुळे अपेक्षित व्यवसाय न झाल्याने यंदा दिवाळीचा सणही मंदीतच गेल्याचे सारसोळेतील मच्छीमारांनी सांगितले. 

रोजीरोटीवर पाणी
वादळामुळे हक्काच्या रोजीरोटीवर पाणी सोडावे लागत आहे. खाडीलगत जवळपास मासे मिळत नसल्याने मच्छीमाराला खोल समुद्रात मासेमारीसाठी जावे लागते. वादळाची सूचना मिळाली की समुद्रात गेलेल्या मच्छीमारांच्या बोटी माघारी आणल्या जातात. कधी कधी दहा-बारा दिवस बोटी धक्‍क्‍यावरच उभ्या राहत असल्याची माहिती मरीआई मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष हरीश सुतार यांनी दिली.

छोट्या नौका असणाऱ्यांचे दिवसाला दीड ते २ हजाराचे, एक-दोन सिलिंडर असलेल्या होड्यांचे ५ हजार; तर ट्रॉली असणाऱ्यांचे तीन लाखांच्या घरात नुकसान होते. आताही चक्रीवादळामुळे बराच काळ होड्या उभ्या होत्या; मात्र नुकसानभरपाई मिळत नाही. शेतकऱ्याला जशी नुकसानभरपाई मिळते, तशी मच्छीमारांनाही मिळायला हवी.
- हरीश सुतार, अध्यक्ष, मरीआई मच्छीमार सहकारी संस्था.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fisherman losses due to Hurricane