मच्छीमारांना मेनंतर भरपाई

मच्छीमारांना मेनंतर भरपाई

नवी मुंबई - शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूच्या कामात मच्छीमारांच्या होणाऱ्या नुकसानीच्या बदल्यात देण्यात येणाऱ्या भरपाईचा पहिला हप्ता मे महिन्यानंतर देण्यात येणार आहे. मच्छीमारांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांच्यासोबत दिवाळे मच्छीमार डोलकर सेवा संस्थेतर्फे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला होता. त्याबाबत वांद्रे येथील कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत अनुदानाचा पहिला हप्ता मेनंतर देण्यात येईल, असे आश्‍वासन एमएमआरडीएचे मुख्य अभियंता दत्तात्रेय ठुबे यांनी दिले. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दक्षिण मुंबईला जोडण्यासाठी राज्य सरकारतर्फे एमएमआरडीए शिवडी-न्हावा शेवा समुद्रात सागरी सेतू बांधण्यात येत आहे. सेतूच्या निर्माण कार्यकाळात मच्छीमारांना मासेमारी करता येणार नाही. त्या बदल्यात सरकारकडून त्यांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे बहुतांश कोळी समाजाने होडीनिहाय माहिती मत्स्यविकास विभागामार्फत सरकारकडे सादर केली आहे. परंतु, त्याचा पहिला हप्ता मच्छीमारांना न मिळाल्याने मंदा म्हात्रे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. तसेच नवी मुंबईतील दिवाळे गावातील मच्छीमार डोलकर सेवा संस्थेतर्फे पहिल्या हप्त्याबाबत चौकशी करण्यात आली होती. त्यावर मच्छीमारांसोबत चौकशी करण्यासाठी वांद्रे येथील एमएमआरडीएच्या कार्यालयात एक बैठक घेण्यात आली होती. त्या वेळी मुख्य अभियंता दत्तात्रेय ठुबे, मंदा म्हात्रे, अधीक्षक अभियंता शरद वरसकर, कार्यकारी अभियंता गणेश देशपांडे, ‘डोलकर सेवा’चे अध्यक्ष पांडुरंग कोळी, ‘खांदेवाले मच्छीमार’चे भाग्यवान कोळी, अनंता बोस आदी पदाधिकारी उपस्थित होते. नुकसानभरपाईच्या दिरंगाईबाबत मंदा म्हात्रे यांनी बैठकीत प्रशासनाला जाब विचारला. 

नुकसानभरपाई बॅंक खात्यात
मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यासाठी लवकरच सर्वेक्षण समिती स्थापन होईल. त्यानंतर दोन महिन्यांत नुकसानभरपाईचे हप्ते बॅंक खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल, असे आश्‍वासन दत्तात्रेय ठुबे यांनी बैठकीत दिल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com