बेस्ट आणिक आगारात वाहनांची फिटनेस टेस्ट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

मुंबईतील चारही आरटीओ कार्यालयांत 250 मीटरचा फिटनेस टेस्ट ट्रॅक नसल्यामुळे हजारो वाहनचालकांना शहराबाहेर जावे लागत होते. आता वडाळा आणि ताडदेव आरटीओ कार्यालयांच्या क्षेत्रांतील खासगी, अवजड वाहनांची फिटनेस चाचणी बेस्ट उपक्रमाच्या आणिक आगारात होणार आहे. 

मुंबई - मुंबईतील चारही आरटीओ कार्यालयांत 250 मीटरचा फिटनेस टेस्ट ट्रॅक नसल्यामुळे हजारो वाहनचालकांना शहराबाहेर जावे लागत होते. आता वडाळा आणि ताडदेव आरटीओ कार्यालयांच्या क्षेत्रांतील खासगी, अवजड वाहनांची फिटनेस चाचणी बेस्ट उपक्रमाच्या आणिक आगारात होणार आहे. 

व्यावसायिक वाहनांना दर वर्षी वाहन योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) घेणे बंधनकारक असते. या प्रमाणपत्राशिवाय वाहन रस्त्यावर आल्यास आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांकडून कारवाई करून दंड आकारला जातो. वाहनांच्या ब्रेक चाचणीसाठी आरटीओ कार्यालयांमध्ये 250 मीटरचा टेस्ट ट्रॅक आवश्‍यक असतो. मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरिवली या चार आरटीओ कार्यालयांत टेस्ट ट्रॅक उपलब्ध नसल्यामुळे व्यावसायिक वाहनचालकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 250 मीटरचा टेस्ट ट्रॅक नसल्यामुळे वाहनांना फिटनेस सर्टिफिकेट मिळणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे मुंबईतील वाहनांची शहराबाहेरील आरटीओ कार्यालयांत तपासणी करण्याचा पर्याय देण्यात आला होता. 

परिवहन विभागाने आणिक आगारात वाहन चाचणी करण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडे डिसेंबरमध्ये परवानगी मागितली होती. बेस्ट उपक्रमाने परवानगी दिल्यामुळे वडाळा आणि ताडदेव आरटीओ कार्यालयांत नोंदणी झालेल्या खासगी, अवजड वाहनांना आणिक आगारात फिटनेस चाचणीसाठी जाता येईल. त्यासाठी हलक्‍या वाहनांकडून 50 रुपये आणि अवजड वाहनांकडून 100 रुपये शुल्क आकारले जाईल, असे बेस्ट उपक्रमातर्फे सांगण्यात आले. 

वाहनचालकांना दिलासा 
मुंबईत वाहनांची फिटनेस चाचणी घेता येत नसल्यामुळे सर्व आरटीओ कार्यालयांत मोठी प्रतीक्षा यादी तयार झाली आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही अतिरिक्त ताण आला आहे. आणिक आगारात वाहनांच्या फिटनेस चाचणीला परवानगी मिळणार असल्यामुळे ही समस्या सुटल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. 

Web Title: fitness test of vehicles at Best depo