मुंबईत फ्लेमिंगोच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्‍नचिन्ह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

मुंबई - मालाड येथील फ्लेमिंगोच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गोवंडीतही चोरट्यांनी फ्लेमिंगोला पकडून पिंजऱ्यात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कांदळवन विभागाने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे अधिकारी तिवरांच्या जंगलाच्या संरक्षणासाठी तैनात केलेले आहेत. तसेच सात गुप्त ठिकाणी चौक्‍याही उभारल्या आहेत. तरीही ही घटना घडल्याने फ्लेमिंगोच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्‍नचिन्ह उभे आहे.

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी वन विभागाच्या साह्याने ही कारवाई केली. शनिवारी कर्जतसह मुंबईतील सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. गोवंडीतील बैंगनवाडीतील एका संशयिताच्या घरी धाड टाकण्यात आली. त्या वेळी त्याच्या घरात परदेशी पक्ष्यांसह फ्लेमिंगोही मिळाला. या वेळी एन. मोहम्मद आणि शाहीद मोहम्मद यांना डीआरआयने ताब्यात घेतले. फ्लेमिंगोला वन विभागाच्या शिकार प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. त्याची शारीरिक तपासणी पूर्ण झाली असून, किमान चार दिवस फ्लेमिंगोला वन विभागाच्या ताब्यात ठेवण्यात येईल. डीआरआयची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही आरोपींना वन विभागातर्फे ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात येईल. वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार या दोन्ही आरोपींना तीन वर्षांची शिक्षा तसेच २५ हजारांचा दंड होऊ शकतो. माहुल गाव तसेच वाशी खाडीतील फ्लेमिंगो अभयारण्य, उरण आदी भागांत फ्लेमिंगो पक्षी मोठ्या संख्येने येतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flamingo Security in Mumbai