उरण परिसरात वीज वाहिन्यांचा फ्लेमिंगोंना झटका 

उरण परिसरात वीज वाहिन्यांचा फ्लेमिंगोंना झटका 

नवी मुंबई  - उरण तालुक्‍यातील पाणजे ही पाणथळ फ्लेमिंगोंसाठी प्रसिद्ध आहे. पण, या परिसरातील उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांमुळे त्यांच्या जीवावर बेतू लागले आहे. गेल्या दोन महिन्यांत त्यांच्या धक्‍क्‍याने २५ पेक्षा अधिक फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त कहरण्यात येत आहे.

शुक्रवारीही (ता. २५) याच भागात वीज वाहिनीला धडकून एका फ्लेमिंगोचा मृत्यू झाला होता; तर दुसऱ्या दिवशी दोन फ्लेमिंगोंचा अशाच पद्धतीने बळी गेला. उरण परिसरातील पाणथळीवर अनेक पक्षी अन्नाच्या शोधात येतात. त्यांचा वावर पाणजे आणि डोंगरी खाडी किनारी मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळतो. याच भागात जेएनपीटीला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यांचे जाळे पसरले आहे. त्यांच्या धक्‍क्‍याने शुक्रवारी सकाळी पक्षिप्रेमी पराग घरत यांना एक फ्लेमिंगो मृत आढळला. त्याचे पंख जळाले होते. पुन्हा शनिवारी आणखी दोन फ्लेमिंगो मृत आढळले. 

घरत म्हणाले, की ‘फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळल्यानंतर या पूर्ण परिसरात फेरफटका मारला. त्यावेळी २० ते २५ फ्लेमिंगोंचे सापळे आढळले. विजेच्या टॉवरच्या एका बाजूला पाणजे पाणथळ आहे, तर दुसऱ्या बाजूला मिठागरांच्या शेजारी छोट्या छोट्या पाणथळी आहेत. त्यामुळे या दोन्ही पाणथळीच्यादरम्यान त्यांचा प्रवास सुरू असतो, त्यातच त्यांचे बळी जातात. 

महावितरणचे दुर्लक्ष
वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गासंदर्भात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत. त्यामध्ये पक्षांच्या भ्रमणमार्गात येणारे विजेचे टॉवर, वीज वाहिन्यांसंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, महावितरण आणि वनविभागामार्फत मार्गदर्शक तत्वांचे पालन होताना दिसत नाही. शिवाय याबाबत वन अधिकाऱ्यांना माहिती देऊनही त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे, येथील पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com