राहिले रे, दूर घर त्याचे...! फ्लेमिंगोला मिळणार कृत्रिम पाय

कविता भोसले
बुधवार, 3 मे 2017

फ्लेमिंगोच्या पायाला झालेली जखम अद्याप ओली आहे. ती सुकल्यानंतरच कृत्रिम पाय लावता येईल. त्यासाठी सहा ते सात हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च उचलण्यासाठी पक्षीप्रेमींनी पुढे यायला हवे.
- डॉ. जे. सी. खन्ना,
प्रमुख, बैलघोडा रुग्णालय

मुंबई : सैबेरियातून हजारो मैलांचा प्रवास करून मुंबईत आलेला एक फ्लेमिंगो पुन्हा मायदेशी परतू शकणार नाही. शिवडीच्या खाडीत सवंगड्यांबरोबर बागडणारा हा फ्लेमिंगो एका विकृताने भिरकावलेल्या दगडामुळे जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या पायावर मुंबईच्या बैलघोडा रुग्णालयात शस्त्रक्रिया होईल. या फ्लेमिंगोला कृत्रिम पाय मिळेल. जगात अशा प्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच होणार असली तरी त्यानंतरही त्याचे घर दूरच राहणार आहे. कारण या दुखापतीमुळे या फ्लेमिंगोच्या पंखात मायदेशापर्यंत भरारी घेण्याचे बळ राहिलेले नाही...

ऊबदार वातावरणाच्या शोधात आपल्या सवंगड्याबरोबर भारतात आलेल्या या फ्लेमिंगोला आता कदाचित असह्य उकाड्याचा सामना करावा लागेल. अर्थात उकाडा असो वा नसो, सवंगडी परतल्यानंतर एकट्याने मागे राहणे कुणासाठीही असह्यच ठरेल! कुणी त्याची तुलना "पीके'शी करेलही. तो आमीरने साकारलेला "पीके' त्याचे लॉकेट हरवल्याने दूर"देशी' (मूळ ग्रहावर) परतू शकत नाही. त्याची ती असाह्य होतो, हतबलता आणि तगमग या फ्लेमिंगोच्या फडफडीतून व्यक्त होताना दिसेलही कदाचित.
सैबेरियात थंडी सुरू झाली की लाखो फ्लेमिंगो ऊब आणि खाद्याच्या शोधात भारतात येतात. त्यातील हजारो फ्लेमिंगो वाशी आणि शिवडीच्या खाडीत बस्तान बसवतात. काही काळाने आपल्या मायदेशातील ऊब अनुभवण्यासाठी परत फिरतात. हे चक्र हजारो वर्षांपासून सुरू असावे. मुंबईत कॉंक्रिटचे जंगल वाढू लागले असले तरीही या प्रवासी पक्ष्यांचे जाणे-येणे थांबलेले नाही; पण यंदा मात्र हे सनातन चक्र एका फ्लेमिंगोच्या बाबतीत तरी भंगले. एका दगडी काळजाच्या व्यक्तीने भिरकावलेल्या दगडामुळे! गंभीर जखमी झालेल्या फ्लेमिंगोवर परळ येथील बैलघोडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या फ्लेमिंगोला ऍल्युमिनियमचा कृत्रिम पाय लावण्यात येईल.

बैलघोडा रुग्णालयाचे मुख्य अधिकारी डॉ. जे. सी. खन्ना म्हणतात, "यापूर्वी अनेक प्राणी आणि पक्ष्यांना कृत्रिम पाय लावण्यात आले आहेत; मात्र फ्लेमिंगोला शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम पाय पहिल्यांदाच मिळणार आहे. त्यानंतर हा मुका जीव बागडू शकेल. थोडाफार उडूही शकेल; पण सैबेरिया हा खूप लांबचा पल्ला आहे. गंभीर शस्त्रक्रियेनंतर तो अधिकच अवघड ठरेल.

Web Title: Flemingo's return to siberia impossible with artificial limbs