मनोरमध्ये पूर ओसरल्याने दिलासा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

मनोर परिसरात शुक्रवारपासून बरसणाऱ्या पावसाचा जोर रविवारी रात्री कमी झाला. त्यामुळे सोमवारी (ता. 5) पहाटेपासून अनेक ठिकाणी साचलेले पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली.

मनोर ः मनोर परिसरात शुक्रवारपासून बरसणाऱ्या पावसाचा जोर रविवारी रात्री कमी झाला. त्यामुळे सोमवारी (ता. 5) पहाटेपासून अनेक ठिकाणी साचलेले पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. सोमवारी पहाटे चारच्या सुमारास मनोर-पालघर रस्त्यावरील वाहतूक सुरू झाली. पावसाचा जोर कमी झाल्याने मनोर परिसरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. 

वैतरणा, देहरजा आणि हात नदीला पूर आल्याने मनोर गावातील नवी वस्ती, अवचित पाडा, सन सिटी आणि मासळी मार्केटमध्ये पुराचे पाणी शिरले होते. मनोर मंडळ क्षेत्रातील टाकवाहाल, नांदगाव, दुर्वेस काटेला पाडा, साये, एरंबी या गावांत पुराचे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरले होते.  मनोर-पालघर रस्त्यावरील वाहतूक शनिवारपासून बंद होती. पावसाचा जोर कमी झाल्याने वैतरणा आणि हात नदीच्या पुराचे पाणी सोमवारी पहाटेपर्यंत कमी झाले. 

मनोरच्या नवी वस्ती येथील नजीब आगासकर यांच्या घरासह 10 घरात पुराच्या पाण्यामुळे संसारोपयोगी सामान भिजल्याने मोठे नुकसान झाले. तसेच सन सिटी, मासळी मार्केट आणि अवचित पाड्यात पुराचे पाणी शिरल्याने काही प्रमाणात नुकसान झाले आहे. 

खासे पाड्याला पाण्याचा वेढा कायम 
दुर्वेस-सावरे रस्त्यावरील एरंबी येथे सुमारे दीडशे घरांमध्ये पाणी शिरले होते. अजूनही खासे पाड्याला पाण्याचा वेढा पडलेला आहे. दुर्वेस-सावरे रस्ता बंद असल्याने त्यांच्यापर्यंत मदत पोहचू शकली नव्हती. याठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनात सुरू करण्यात आले होते. टाकवाहाल गावातील वैतरणा नदीकाठच्या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The floodwaters flooded in Manor near Mumbai