गणेशोत्सवात फुलांच्या किमती दुपटीने वाढल्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

थर्माकोलच्या वापराला राज्य शासनाने बंदी घातल्याने गणेशमूर्तीभोवती फुलांची सजावट करणाऱ्या भाविकांचे प्रमाणही वाढले आहे. घरातील मूर्तीभोवती सजावटीवर बऱ्यापैकी खर्च करू शकणारे मध्यमवर्गीय भाविक फुलांच्या सजावटीला अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे यंदा प्रथमच फुलांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

नवी मुंबई : थर्माकोलच्या वापराला राज्य शासनाने बंदी घातल्याने गणेशमूर्तीभोवती फुलांची सजावट करणाऱ्या भाविकांचे प्रमाणही वाढले आहे. घरातील मूर्तीभोवती सजावटीवर बऱ्यापैकी खर्च करू शकणारे मध्यमवर्गीय भाविक फुलांच्या सजावटीला अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे यंदा प्रथमच फुलांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

गणरायाच्या मूर्तीभोवती आकर्षक फुलांची सजावट करण्यासाठी दोन-तीन हजारांपासून वीस हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. सजावट करण्यासाठी खास फूलवाल्याला बोलावले जाते. साधारण सात दिवसांत तीन-चार वेळा फुले बदलली जातात. मखरापेक्षा इकोफ्रेंडली फुलांची सजावट लोकप्रिय झाल्याचे विक्रेत्यांनी सांगण्यात येत आहे. मात्र ऑर्किड, झरबेरा व इतर फुले महागल्याने सर्वसामान्यांना यंदा या फुलांची सजावट करताना खिशाला कात्री लावावी लागणार आहे. थर्माकोलच्या मखरांचा वापर न करता अधिकाधिक भाविकांनी इको-फ्रेंडली म्हणजे फुलांची सजावट करायला हवी, असा सूर गणेशभक्तांमधून उमटू लागला आहे. 

गणेशाला प्रिय असलेले जास्वंदाचे एक फूल बाजारात सध्या १० रुपयांना विकले जात आहे. जास्वंदाच्या १०० फुलांसाठी आठशे ते हजार रुपये मोजावे लागत असल्याचे छोट्या विक्रेत्यांनी सांगितले. एरव्ही ३०-४० रुपयांत जास्वंदीच्या १०० फुले (कळ्या) मिळतात. यंदा मात्र एक फूल १० रुपयांना विकले जात असल्याचे फूलविक्रेत्यांनी सांगितले. मोगरा ८०० रुपये किलो दराने विकला जात असून, एरवी त्याचा दर २००-३०० रुपये किलो असतो. चाफ्याच्या एका फुलाची किंमत पाच ते दहा रुपये इतकी झाली आहे. 

गणेश मंडळांच्या कमानीला फुलांची सजावट केली जाते. त्यामुळे फुलांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. तसेच मोठ्या मूर्तींना लागणाऱ्या हारांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. 
- प्रकाश शिंदे, फूलविक्रेते.

ऑर्केट     ५००     १२ नग
गुलाब     ७०/ ८०       ६ नग 
शेवंती     २५० ते ३००     १५० नग 
जिप्सी     २३५ ते ३०० 
झरबरा     ८० रुपये     (प्रति किलो)
लिलियाम     ८०० रुपये    १२ नग
इंथिर      ७० रुपये
झेंडू     १०० ते १२०     (प्रति किलो)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flower prices increased double during Ganeshotsav