गणेशोत्सवात फुलांचे भाव कडाडणार! 

संदीप पंडीत
रविवार, 25 ऑगस्ट 2019

बाजारपेठेतील आवक घटली; शेतकऱ्यांना फटका तर ग्राहकांना भुर्दंड

विरार : वसई तालुका हा फुलांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र या वर्षी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका येथील फूलशेतीला बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. साहजिकच फुलांची आवक कमी झाली आहे. आता ऐन गणपतीत फुलांचे भाव कडाडणार असून ग्राहकांना भुर्दंड बसणार आहे.

वसई तालुक्‍यातील मोगरा, जाई, जुई, सोनचाफा, जास्वंद, गुलाब या फुलांना मुंबईच्या बाजारात मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो; परंतु यंदा झालेल्या मुसळधार पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दरवर्षी होणाऱ्या फुलांच्या उत्पादनापेक्षा जवळपास पावपटही उत्पादन यंदा झाले नाही. गेल्या वर्षी या हंगामात 15 हजारांच्या आसपास निघणारा सोनचाफा, आता अवघा दोन हजारांच्या आसपास निघत आहे.

फुलांच्या माध्यमातून गणपतीच्या हंगामात शेतकऱ्यांना मिळणारे आर्थिक उत्पन्न या वर्षी मात्र त्यांना मिळणार नाही. सोनचाफ्याबाबत ही दशा असून अन्य फुलांच्या बाबतीतही काही वेगळे चित्र नाही. त्यामुळे या वर्षी फुलांचे भाव प्रचंड कडाडणार आहेत. फुलांबरोबरच पूजेला लागणाऱ्या तुळशीच्या रोपांनाही पावसाचा फटका बसल्याने उत्पादन घटले. त्यामुळे तुळशीचा भावही वाढणार आहे. 

नजीकच्या फुलशेतीलाही पुराचा तडाखा

मोगरा या वर्षी साधारणपणे 2200 रुपयांनी, सोनचाफा 1800 ते 1900 रुपयांनी, तर जास्वंद 600 ते 700 रुपयांनी बाजारात विकला जाणार असल्याचे बोलले जात आहे. यातच मुंबईच्या मार्केटमध्ये वाडा, विक्रमगड, नाशिक, जव्हार, कोल्हापूर, सांगली येथून फुले येत असतात; परंतु त्या भागातही पुरामुळे फुलांचे उत्पादन कमी झाल्याने फुलांचे भाव कडाडणार आहेत. 

"पावसामुळे फुलशेतीला मोठा फटका बसला आहे. उत्पादन कमी झाल्याने आम्हाला या शेतीत टाकलेले पैसेही मिळण्याची शाश्‍वती नाही. शासनाने मदतीचा हात द्यावा, परंतु तुटपुंजी मदत देऊ नये. इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांना कर्जात सूट दिली जाते. आम्हाला विमा योजनाही लागू नसल्याने शासनाने या ठिकाणी चांगल्या बाजारपेठेसह शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत सहजतेने पोहचण्यासाठी प्रयत्न करावेत.' 
- सुभाष भट्टे,
वसंतराव नाईक फूलशेती पुरस्कारप्राप्त शेतकरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flower prices will increase at Ganeshotsav!