पालिका-रेल्वेची टोलवाटोलवी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

मुंबई - लोअर परळ रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीस बंद करण्यावरून रेल्वे व महापालिकेने सोमवारी टोलावाटोलवी सुरू केली. या दोनही संस्था एकमेकांवर जबाबदारी टाकत असल्याने त्या परिसरातून जाणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय, हा यक्षप्रश्‍न उभा आहे. 

मुंबई - लोअर परळ रेल्वेमार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीस बंद करण्यावरून रेल्वे व महापालिकेने सोमवारी टोलावाटोलवी सुरू केली. या दोनही संस्था एकमेकांवर जबाबदारी टाकत असल्याने त्या परिसरातून जाणाऱ्या लाखो प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय, हा यक्षप्रश्‍न उभा आहे. 

रेल्वेने हा पूल बंद करण्याची शिफारस रविवारी मुंबई महापालिकेला केली होती. त्याच्या उत्तरादाखल सोमवारी पालिकेने रेल्वेच्या हद्दीतील पूल रेल्वेनेच वाहतुकीला बंद करावा, असे पत्रच दिले. पुलावरील वाहतूक बंद करण्याची वेळ आली असली तरीही हा निर्णय तातडीने का घेतला जात नाही, ही जबाबदारी एकमेकांवर का ढकलली जात आहे, असे प्रश्‍नही यानिमित्ताने प्रवासी विचारत आहेत. 

अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेनंतर रेल्वे, महापालिका व मुंबई आयआटीच्या तज्ज्ञांनी रेल्वेवरील सर्व पुलांचे ऑडिट करण्यास सुरुवात केली आहे. त्यात लोअर परळ स्थानकातील ना. म. जोशी मार्गावरील उड्डाणपूल धोकादायक असल्याचे आढळले. त्यानुसार पश्‍चिम रेल्वेने हा पूल बंद करण्याची शिफारस पालिकेला दिली; मात्र महापालिकेने हा पूल बंद न करता रेल्वेने त्यांच्या हद्दीतील पूल बंद करावा, असे प्रत्युत्तर पालिकेने दिले आहे. 

ना. म. जोशी मार्गावरील या पुलाबरोबरच ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल येथील बेलासिस पूल, दादर येथील टिळक पूल, महालक्ष्मी येथील उड्डाणपूल; तसेच प्रभादेवी स्थानकावरील करोल पूल या पुलांची तत्काळ दुरुस्ती करण्याची शिफारस रेल्वेने केली आहे. महापालिका आणि रेल्वेच्या या "तू तू मैं मैं'च्या कारभाराने प्रवाशांचा जीव टांगणीवर लागला आहे. या परिसरातील गिरण्या बंद होऊन तेथे मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट कार्यालये उभी राहिली आहेत. त्यामुळे पुलावर नेहमीच वर्दळ असते. अशा स्थितीत प्रशासनाने तातडीने या जीर्ण पुलांची दुरुस्ती करावी किंवा ते बंद करावेत, अशी मागणी केली जात आहे. 

वाहतूक कोंडी होणार  
वरळी व लालबागला जोडणारा लोअर परळचा हा महत्त्वाचा उड्डाणपूल बंद झाला, तर वाहनचालकांची अडचण होऊन परिसरात मोठी वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे. या पुलाच्या नंतर महालक्ष्मीचा उड्डाणपूल व प्रभादेवीचा करोल पूल आहे. त्यासाठी वाहनचालकांना मोठा वळसा घेणे भाग आहे, तसेच प्रभादेवीचा पूल अरुंद असल्याने परिसरात वाहनांची मोठीच गर्दी होऊ शकते. 

"सकाळ'कडून पाठपुरावा 
ब्रिटिशकाळापासून शहरात बांधलेल्या अनेक उड्डाणपुलांचे आयुष्य आता संपलेले असल्यामुळे त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. या संदर्भात "मुंबई टुडे'मध्ये सविस्तर वृत्त देत पाठपुरावाही केला आहे. 

रेल्वेने त्यांच्या हद्दीतील पूल बंद करावा. तसे पत्र त्यांना पाठवले आहे. 
- शीतलाप्रसाद कोरी, पूल विभागाचे मुख्य अभियंता, महानगरपालिका 

Web Title: Flyover on Lower Parel