मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील उड्डाणपूल अंधारात

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील उड्डाणपूल अंधारात
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील उड्डाणपूल अंधारात

नवी मुंबई : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलावर रस्ते विकास महामंडळाने पथदिवे लावले आहेत; मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ते बंद असल्याने येथे अंधाराचे जाळे पसरले आहे. याचबरोबर पनवेल-शीव महामार्गावरील सिग्नल यंत्रणाही धूळ खात पडून आहे. रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको आणि महापालिका यांच्यामध्ये समन्वय नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना गैरसोईला सामोरे जावे लागत असून दररोज लहान-मोठे अपघातही घडत आहेत.

पालिकेच्या हद्दीतून पनवेल-शीव व राष्ट्रीय महामार्ग ४ जातो. हे दोन्ही महामार्ग अनुक्रमे सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते विकास महामंडळाच्या मालकीचे आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर कळंबोली आणि खांदा वसाहतीत उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. या पुलांवर पथदिवेसुद्धा बसवण्यात आले आहेत; मात्र ते आजतागायत कार्यान्वित झालेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कळंबोली व खांदा कॉलनी येथील पुलाची देखभाल रस्तेविकास महामंडळाकडून करणे अपेक्षित असताना या पुलावरील पथदिवे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पनवेल पालिकेने किंवा सिडकोने कार्यान्वित करून त्याची देखभाल करणे क्रमप्राप्त असल्याचे रस्ते विकास महामंडळ विभागाकडून सांगण्यात आले. तसेच याकरिता येणारे वीजबिलसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेने भरावे, असे त्यांचे म्हणणे आहे. या वादात बंद असलेल्या पथदिव्यामुळे उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी अंधाराचे जाळे पसरत आहे. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. याबाबत पालिकेने आपली भूमिका स्पष्ट करावी, याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सतीश पाटील यांनी प्रशासनाला पत्र दिले आहे.  

बांधकाम विभाग खर्च करणार
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा आहे. बरेच सिग्नल बंद अवस्थेत आहेत. याशिवाय पनवेल-शीव महामार्गावरील कामोठे, खारघर हिरानंदानी येथील सिग्नल यंत्रणा बंद आहेत. दरम्यान, अपघात प्रतिबंधात्मकदृष्ट्या; तसेच वाहतूक नियमांसाठी ही सिग्नल यंत्रणा सुरू होणे आणि कायमस्वरूपी चालणे आवश्‍यक आहे. मात्र संबंधित यंत्रणा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पालिकेकडे बोट दाखवत आहेत. पालिका स्थापन झाल्याने सिडकोसुद्धा पालिकेकडे बोट दाखवीत आहे. कामोठे येथील सिग्नल चालू करण्याकरिता भाजपचे स्थानिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. सिडकोने याबाबतची जबाबदारी घेण्याचे मान्य केले आहे; तर येणारा खर्च बांधकाम विभाग देणार आहे. 

पथदिवे सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे दाद
कळंबोली आणि खांदा कॉलनीतील उड्डाणपुलावर पथदिवे लावून सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. वेगळ्या यंत्रणांच्या घोळात अडकलेल्या या प्रश्नासंदर्भात भाजपचे कळंबोली उपाध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे (सीएमओ) तक्रार केली आहे. प्रधान सचिव अजोय मेहता त्यांनी याबाबत दखल घेत रस्ते विकास महामंडळाला योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com