अपयश झाकण्यासाठी भावनिक विषयांवर फोकस; प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

कृष्ण जोशी | Sunday, 6 September 2020

आता कोरोनाचे अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार सुशांतसिंह व अन्य भावनिक विषयांचा आधार घेत आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केली. 

मुंबई - कोरोनाशी लढा देण्याबाबत तसेच राज्यासमोरील अन्य प्रश्नांसंदर्भात आपण तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना सूचना करणारी अडीचशे पत्रे लिहिली, मात्र त्याचे साधे उत्तरही आले नाही. आता कोरोनाचे अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार सुशांतसिंह व अन्य भावनिक विषयांचा आधार घेत आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केली. 

ऐकाल तर नवलच! कर्जतमध्ये कोंबडीचोरांचा सुळसुळाट; शेकडो कोंबड्या अचानक गायब

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. त्यात जेवढा वेळ मिळेल तेवढ्या काळात सरकारला धारेवर धरू. कोरोनाचे थैमान वाढत असून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थितीही बिघडली आहे. पूरग्रस्तांचे प्रश्नही आहेतच, या सर्वांबाबत आम्ही सरकारला जाब विचारू. पण फक्त सरकारला कोंडीत पकडण्यापेक्षा सूचना देऊन त्यांच्या चुका दुरुस्त करण्यास सांगू, असेही दरेकर यांनी सांगितले. आज त्यांनी भाजपची भूमिका वरीलप्रमाणे स्पष्ट केल्यामुळे या अधिवेशनातही सत्ताधारी आणि विरोधक यांच्या चकमकी झडतील असेही बोलले जात आहे.

कोरोनाशी लढा, कोरोनामुळे रोजगार गमावलेल्यांना मदत देण्याचा प्रश्न, कोकणपट्टीतील वादळग्रस्त मच्छिमार तसेच राज्यातील पूरग्रस्त आदींना नुकसानभरपाई देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या भयावह वेगाने वाढते आहे. कोरोना केंद्रात महिला रुग्णांवर अत्याचारही झाले आहेत. त्यामुळे या मुख्य मुद्यांवरून लोकांचे लक्ष उडवण्यासाठी सुशांतसिंह, कंगना रनौत तसेच अन्य भावनिक मुद्यांवर सरकार फोकस करीत आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली. 

स्कूलबसमालक-चालक मोठ्या संकटात;  गाड्यांच्या हफ्त्यांसह देखभाल-दुरुस्तीचाही भुर्दंड 

पुण्यात, पश्चिम महाराष्ट्रात तसेच राज्याच्या ग्रामीण भागात कोरोना वेगाने वाढतो आहे, जंबो कोविड सेंटरमधील अनेक गैरप्रकार मी स्वतः पुराव्यांनिशी उघड केले होते. मात्र याबाबत आम्ही केलेल्या सूचनांची सरकारने दखलही घेतली नाही. हे अल्पमुदतीचे अधिवेशन नेमके कसे घेणार याबाबतही स्पष्टता नाही, मात्र तरीही सरकारला जाब विचारण्याचे काम आम्ही करू, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

-----------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )