धुक्‍यामुळे मंदावला लोकलचा वेग 

धुक्‍यामुळे मंदावला लोकलचा वेग 

ठाणे - सिग्नल बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, रेल्वेरुळांना तडा, इंजिन बिघाड आणि अतिपावसामुळे खोळंबणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेला आता दाट धुक्‍यांचा फटका सोसावा लागत आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याणपलीकडच्या भागांत सकाळच्या वेळात धुक्‍याचे साम्राज्य निर्माण होऊ लागल्याने लोकल गाड्यांचा वेग कमी होऊ लागला आहे. यामुळे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडत आहे. थंडीमुळे रेल्वेरुळाला तडा जाण्याचे प्रकारही वाढल्याने आधीच धीम्या गतीने धावणाऱ्या गाड्या आता धुक्‍यामुळे टप्प्या-टप्प्यावर थांबू लागल्या आहेत. रविवारीही याचा अनुभव आला असून पुढील काही दिवस तो वाढण्याची शक्‍यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

थंडीची लाट आणि धुक्‍याचा थर यामुळे शहरामध्ये सूर्यदर्शन उशिरा होऊ लागले आहे. सकाळच्या वेळात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली या स्थानकांच्या दरम्यान धुक्‍यांची चादर पसरलेली असते, तर कल्याणपलीकडच्या स्थानकाची परिस्थिती त्याहून गडद असते. अशा वेळी गाड्या थांबवून मोटरमनला अंदाज घ्यावा लागत आहे. पहाटे थंडी, दुपारी कडक ऊन या वातावरणातील मोठ्या बदलांमुळे रेल्वेरूळ तडकण्याचा धोका निर्माण होत असल्याने लोकल धीम्या गतीने चालवण्याची वेळ येते, असे उपनगरीय रेल्वेच्या मोटरमननी सांगितले. प्रवाशांना यामुळे त्रास सहन करावा लागत असला, तरी त्यांच्या सुरक्षेला महत्त्व देऊन लोकल गाड्या हाकल्या जात असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे; तर धुके नसलेल्या भागांमध्ये रेल्वेचा वेळ भरून काढला जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. 

वेग 20 ते 30 किमी प्रतितास 
थंडीमुळे वेगावर मर्यादा येत असून मोठ्या प्रमाणात धुके असल्याने गाड्या 20 ते 30 किमी प्रतितासाच्या वेगाने चालवण्याच्या सूचना मोटरमनला देण्यात आल्या आहेत. आवश्‍यक ठिकाणी सिग्नल दिसत नसल्यास गाड्या थांबवण्यासही सांगितले गेले आहे. एरवी 100 किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या गाड्या धुक्‍यामुळे मात्र कासवगतीने धावू लागल्या आहेत, तर जुन्या गाड्यांचा वेग 90 वरून कमी करण्यात आल्याचे ठाण्यातील रेल्वे सूत्रांनी सांगितले. 

लांब पल्ल्याच्या गाड्यांतून प्रवासाची मागणी 
धुक्‍याचा सर्वाधिक फटका कल्याणपलीकडच्या प्रवाशांना होत आहे. सकाळच्या वेळात मुंबईकडे जाताना गाड्या धीम्या गतीने चालल्याने ठरलेल्या वेळात पोहोचता येत नाही. त्यामुळे कल्याणपलीकडच्या प्रवाशांना थंडीच्या काळात लांब पल्ल्याच्या सगळ्याच गाड्यांमधून मुंबईकडे प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी. कल्याण, कर्जत आणि कसारा या स्थानकांमधून जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ घेता येऊ शकेल, अशी मागणी कल्याण, कर्जत आणि कसारा प्रवासी संघटनेचे शैलेश राऊत यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com