अन्न व औषध विभागाच्या चौकशीसाठी समिती
वरिष्ठांच्या आदेशानुसार एकसदस्यीय समिती नेमली आहे. सहायक आयुक्त प्रशांत उमराणी हे चौकशी करतील. यात नागरिकांच्या तक्रारी निकाली काढल्या जातील. सर्वांगीण चौकशी अहवाल आठवडाभरात वरिष्ठांना दिला जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
- सुरेश देशमुख, सहआयुक्त, अन्न व औषध कोकण विभाग
कल्याण - कल्याण-डोंबिवलीत निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री होत असूनही कारवाई होत नसल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध ठाणे विभागाचे सहायक आयुक्त सी. डी. राठोड आणि त्यांच्या पथकाची चौकशी करण्यासाठी एकसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे आदेशही अन्न व औषध कोकण विभाग सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिले आहेत.
अन्न व औषध ठाणे विभागांतर्गत कल्याण-डोंबिवली शहरे येतात. या परिसरात सहायक आयुक्त सी. डी. राठोड आणि त्यांचे पथक काम करते. शहरात अन्नपदार्थ विक्रीची दुकाने आणि हातगाड्या वाढल्या असून त्यासोबतच गुटखा विक्रीही खुलेआम सुरू आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यास अन्न व औषध विभाग अपयशी ठरल्याची तक्रार डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते नामदेव पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन (वांद्रे) मुंबई सहआयुक्त चंद्रकांत साळुंखे यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी अन्न व औषध कोकण विभाग सहआयुक्त सुरेश देशमुख यांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार समिती नेमण्यात आली आहे. अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत उमराणी हे या प्रकरणी चौकशी करणार आहेत. तक्रारी प्रत्यक्ष तपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणेही ते ऐकून घेणार असल्याचे समजते.