अन्नदात्या, आम्ही तुझ्यासोबतच आहोत! 

अन्नदात्या, आम्ही तुझ्यासोबतच आहोत! 

मुंबई - कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे परिस्थितीला शरण जाऊन आत्महत्येसारखे पाऊल उचलणाऱ्या, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांपुढील समस्यांना वाचा फोडण्यासाठी मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी रविवारी (ता.19) अन्नत्याग आंदोलन झाले. आपल्या अन्नदात्याबद्दल सहवेदना दर्शवण्याबाबत "सकाळ'ने केलेल्या आवाहनाच्या पार्श्‍वभूमीवर समाजातील सर्वच स्तरांतील नागरिक आपापल्या परिसरात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. 

यवतमाळ जिल्ह्यातील चीलगव्हाण गावातील साहेबराव करपे-पाटील या शेतकऱ्याने 19 मार्च 1986 रोजी कुटुंबासह आत्महत्या केली होती. "देशातील पहिली शेतकरी आत्महत्या' अशी या घटनेची नोंद झाली. 31 वर्षांनंतरही शेतकऱ्यांपुढील समस्या कायमच आहेत. उलट दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. शेतकऱ्यांसाठी जाहीर होणाऱ्या पॅकेजेसचा निधी मधल्यामध्येच झिरपत असल्याने प्रत्यक्ष बळीराजाला त्याचा फायदाच होत नाही. अनेक चांगल्या योजनाही सरकारी बाबूंकडून लालफितीत अडकल्या आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी राजकीय व्यक्तींकडून त्याचे राजकारणच होत आहे. विरोधी पक्षांतील नेते बळीराजाशी असलेली त्यांची "तळमळ' दाखविण्यासाठी सरकारच्या विरोधात गरळ ओकत असले तरी; शेतकरी आत्महत्यांचा साधा इतिहासही या राजकारण्यांना माहीत नाही, हे एक जळजळीत वास्तव आहे. 

या पार्श्‍वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांच्या नेतृत्वाखाली चीलगव्हाणच्या ग्रामस्थांनी रविवारी (ता.19) महागाव येथे अन्नत्याग आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. अन्नदात्यांच्या मरणयातना सर्वांसमोर याव्यात, ती परिस्थिती बदलणे संबंधित यंत्रणांना भाग पडावे, या उद्देशाने सर्वसामान्य नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन "सकाळ'ने केले होते. सेलिब्रेटींपासून सर्वच स्तरांतील व्यक्तींनी "सकाळ'च्या या भूमिकेचे उत्स्फूर्त स्वागत केले होते. रविवारी राज्यातील विविध भागांतील हजारो नागरिकांनी आपापल्या परिसरात या आंदोलनात सहभाग घेत आम्ही बळीराजाच्या पाठीशी आहोत, असा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 

मुंबई शहर-उपनगर, ठाणे, पालघर, तसेच रायगड जिल्ह्यांतील शेकडो नागरिकांनी रविवारी अन्नदात्याबाबत सहवेदना दर्शवली. नरिमन पॉइंट येथील मनोरा आमदार निवास परिसरात झालेल्या अन्नत्याग उपोषणात अनेक जण सहभागी झाले होते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना या वेळी आदरांजली वाहण्यात आली. 

राज्यात वर्षानुवर्षे शेतकरी आत्महत्या करत आहेत. अनेक सरकारे आली-गेली. मात्र बळीराजापुढील समस्या कायमच आहेत. या पार्श्‍वभूमीवर अन्नदात्याच्या वेदनेशी नाते जोडण्यासाठी, आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहोत, हा दिलासा देण्यासाठी आम्ही या आंदोलनात सहभागी झालो होतो. 
- अनिल गावंडे, मुंबईत झालेल्या आंदोलनाचे निमंत्रक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com