
कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांनी केला जप्त
कल्याण : जगात असे कितीतरी पदार्थ आहेत, जे आपल्या शरीरासाठी अत्यंत हानीकरक असतात. तरी देखील त्याची विक्री राजरोसपणे चालते आणि त्याचे लोकांकडून त्याचे सेवनही मोठ्या प्रमाणात होत असते. असाच एक पदार्थाची तस्करी गुजरातमधून होत असून कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांनी हाच पदार्थ जप्त केला आहे.
हेही वाचा - रडण्याचा आवाज आला, म्हणून ते चेंबरकडे धावले...
हा पदार्थ म्हणजे कर्करोगासाठी सर्वात मोठे कारण असणारा गुटखा... महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असतानादेखील इतर राज्यांतून गुटखा आणून त्याची राजरोसपणे विक्री सुरू असून विशेषतः गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होते. सोमवारी (ता. 27) गुजरातमधून वसई- भिवंडी- कल्याण मार्गे लाखो रुपये किमतीचा गुटखा उल्हासनगर येथे ट्रकमार्फत आणण्यात आला होता. या ट्रकवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून सुमारे 600 किलो गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्याची बाजरात किंमत पाच लाख रुपये इतकी आहे.
महत्त्वाची बातमी - संशयित करोना रुग्णांची दोन वेळा तपासणी
कल्याण पश्चिम दुर्गाडी चौक परिसरात पोलिस हवालदार ओ. जी. उतेकर, पोलिस नाईक डी. बी. हालसे, वॉर्डन सागर कांबळे, वॉर्डन जाधव आदींचे पथक रविवारी रात्रीपासून वाहतूक नियमन करत असताना सोमवारी सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी भिवंडीकडून कल्याणकडे जाणाऱ्या एका छोटा हत्ती टेम्पोवर (क्रमांक एम. एच. 48/ ओ. वाय./ 7211) संशय आल्याने त्यांनी टॅम्पो बाजूला थांबवून त्याची तपासणी केली. या टेम्पोचा चालक बापूसाहेब सुखदेव कराळे (38) असे नाव सांगत उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याचे वाहन तपासले असता त्यात गुटखा आढळून आला. हा 600 किलो गुटखा जप्त करण्यात आला असून अन्न व औषध ठाणे विभागाने याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अल्पवयीन मुलाचा वापर
अवैध गुटखा गुजरातमधून वसई मार्गे कल्याण आणि उल्हासनगरमध्ये आणून अल्पवयीन मुलांमार्फत कल्याण स्टेशन परिसर, रिक्षा स्थानक, बीयर बार आणि दारू दुकानांच्या बाहेर विकण्यात येतो. या सर्वांवर कारवाई कधी होणार, असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत.
प्रतिदिन शहरात येणाऱ्या पुलाजवळ वाहनांवर कारवाई होत असून आजच्या कारवाईमध्ये लाखो रुपयांचा गुटखा पकडण्यात आम्हाला यश आले असून यात सर्वच कर्मचाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे.
- सुखदेव पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण वाहतूक शाखा
गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू असून आगामी काळात पोलिस, पालिका आणि अन्न व औषध विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली जाईल.
- धनंजय कडगे, सहायक आयुक्त, ठाणे विभाग