कल्याण रेल्वेस्थानका बाहेर फूड प्लाझा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

कल्याण पश्‍चिम रेल्वेस्थानकाबाहेर बेकायदा रिक्षा-टॅंक्‍सी स्टॅंड, रिक्षाचालकांची अरेरावी, अश्‍लील शेरेबाजी, स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांचा जाच या सर्वांमधून प्रवाशांची लवकरच सुटका होणार आहे. रेल्वेस्थानकाच्या हद्दीतील बेकायदा रिक्षा आणि टॅक्‍सी स्टॅंड हटवून तेथे फूड प्लाझा आणि प्री-प्रेड रिक्षा, टॅक्‍सी स्टॅंड उभारण्याबाबतचा आराखडा कल्याण रेल्वेस्थानक प्रशासनाने बनवला आहे. हा अहवाल नुकताच मध्य रेल्वेच्या अव्वर विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना सादर केला असून नवीन वर्षात या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. 

कल्याण : कल्याण पश्‍चिम रेल्वेस्थानकाबाहेर बेकायदा रिक्षा-टॅंक्‍सी स्टॅंड, रिक्षाचालकांची अरेरावी, अश्‍लील शेरेबाजी, स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांचा जाच या सर्वांमधून प्रवाशांची लवकरच सुटका होणार आहे. रेल्वेस्थानकाच्या हद्दीतील बेकायदा रिक्षा आणि टॅक्‍सी स्टॅंड हटवून तेथे फूड प्लाझा आणि प्री-प्रेड रिक्षा, टॅक्‍सी स्टॅंड उभारण्याबाबतचा आराखडा कल्याण रेल्वेस्थानक प्रशासनाने बनवला आहे. हा अहवाल नुकताच मध्य रेल्वेच्या अव्वर विभागीय वाणिज्य व्यवस्थापकांना सादर केला असून नवीन वर्षात या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. 
यामुळे स्टेशन परिसरातील कोंडी हटून रेल्वे प्रवासीवर्गाशी हुज्जत घालून वाढीव भाडे मागणाऱ्या रिक्षाचालकांच्या मनमानीला चाप बसणार आहे. 

मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकच्या दिवशी रेल्वेच्या प्रवासी वर्गाकडून रिक्षा आणि टॅक्‍सीचालक वाढीव भाडे घेत असल्याच्या तक्रारी नेहमी येत असतात. मध्य रेल्वेने रिक्षाचालकांच्या या अवैध भाडेवसुलीला चाप लावण्यासाठी पुढाकार घेतला. रेल्वेच्या हद्दीत किती जागा आहे आणि किती अतिक्रमण आहे, याबाबत दादर, पनवेल, कुर्ला, ठाणे आणि कल्याण आदी ठिकाणच्या अधिकारीवर्गाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच स्थानकाबाहेरून रिक्षा आणि टॅक्‍सी प्री-प्रेड सेवा सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्याचे आदेशही जून 2019 मध्ये दिले होते. या धर्तीवर कल्याण रेल्वेस्थानक प्रशासनाने कल्याण पश्‍चिमेकडे रेल्वेच्या हद्दीतील रिक्षा-टॅक्‍सी स्टॅंडच्या अतिक्रमणाबाबत अहवाल तयार केला. हा अहवाल नुकताच मध्य रेल्वेच्या अव्वर विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांना सादर केला असून, नवीन वर्षात स्थानकाबाहेर फूड प्लाझा आणि प्री-पेड रिक्षा-टॅक्‍सी सेवा सुरू करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. 

प्रवाशांच्या तक्रारींची दखल! 
कल्याण रेल्वेस्थानकात प्रवेश करताना प्रवाशांना रिक्षा आणि फेरीवाल्यांच्या जाचाचा सामना करावा लागतो. याबाबत प्रवासी आणि रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासन, रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. कल्याण रेल्वेस्थानकात तिकीट बुकिंग कार्यालयासमोर रेल्वेची जागा असून तेथे रिक्षा आणि टॅक्‍सीचालकांनी अतिक्रमण केले आहे. ही जागा मोकळी करून रेल्वे प्रवाशांना विविध सुविधा देण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार कल्याण रेल्वे प्रशासनाने अहवाल बनवत अतिक्रमण हटवून फूड प्लाझा आणि टॅक्‍सी आणि रिक्षा प्री-प्रेड स्टॅंड सुरू करण्याबाबत प्रस्ताव बनविला आहे. 

अतिक्रमण हटवून... 
प्री-प्रेड टॅक्‍सी आणि रिक्षाचे कूपन घेताच दोन मिनिटात रिक्षा आणि टॅक्‍सी प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. रिक्षा आणि टॅक्‍सी चालकांना जास्त वेळ वाहन पार्क करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. दोन रांगा टॅक्‍सी आणि रिक्षासाठी देण्यात येणार असून काही भाग फूड प्लाझा आणि उर्वरित जागा एक्‍स्प्रेसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवासी वर्गासाठी असणार आहे. तसेच प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे आणि फिरण्यासाठी व्यवस्थाही असणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यास स्टेशन परिसर मोकळा श्वास घेणार असल्याचा विश्‍वास रेल्वे अधिकारी व्यक्त करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Food Plaza outside Kalyan Railway Station