वामसाठी पोलादपूर तालुक्यातील खवय्ये नदीकिनारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

अडीच महिन्यांपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने काही दिवसांपासून उसंत घेतली असल्याने पोलादपूर तालुक्‍यातील आदिवासींबरोबर खवय्यांनी नद्यांमधील मासेमारीकडे मोर्चा वळवला आहे.

पोलादपूर (बातमीदार) : अडीच महिन्यांपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने काही दिवसांपासून उसंत घेतली असल्याने पोलादपूर तालुक्‍यातील आदिवासींबरोबर खवय्यांनी नद्यांमधील मासेमारीकडे मोर्चा वळवला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या गळाला सापासारखा दिसणारा वाम मासा मोठ्या प्रमाणात लागत आहे. यंदा या माशाचा भावही २० टक्‍क्‍यांनी वाढला आहे.

पोलादपूर तालुक्‍यातून वाहणाऱ्या सावित्री, ढवळी, कामथी आदी नद्यांमध्ये खवळ, मळ्या, दांडाळी यांच्यासह वाम सापडते. गणेशोत्सवानंतर वाम मासा पकडण्यासाठी आदिवासी नदीकिनाऱ्यांवर मोठ्या संख्येने दिसतात. काही जण मासे पकडण्यासाठी जाळ्याचा वापर करतात; परंतु गळाचा वापर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. 

वाम माशाला पोलादपूर बाजारपेठेत प्रतिकिलो २५० रुपये भाव मिळत आहे. गेल्या वर्षीपेक्षा तो ५० रुपयांनी वधारला आहे. वाम मासा हा तालुक्‍यातील नद्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्‍टोबरमध्ये सापडतो. सापासारखा दिसत असला तरी अत्यंत स्वादिष्ट आहे. सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत गळ टाकल्यावर ३-४  मासे मिळतात. पोलादपूरामध्ये त्याला सुतेरी या नावाने ओळखण्यात येते.

वाम माशाला चांगला भाव मिळत आहे. पोलादपुरातील खवय्यांचा तो आवडता आहे. या माशामुळे रोजगार मिळत आहे.
- गोऱ्या चव्हाण, आदिवासी

वाम सापासारखा असला, तरी चविष्ट आहे. वर्षातून फक्त २ महिनेच तो नदी मिळतो. गळाच्या सहाय्याने स्वतः गाळाने पकडण्याची वेगळीच मज्जा आहे.
- संजय गायकवाड, स्थानिक

वाम मासा महाग असला, तरी चविष्ट असल्याने खरेदी करतो. या माशासाठी अधिक पैसे देण्यासही मागेपुढे पाहत नाही.
- अंकित पवार, ग्राहक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Foodie Peoples are going on riverside for Vaam Fish