इजिप्त व अफगाणिस्तानचा  कांदा नवी मुंबईत दाखल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

व्यापाऱ्यांची खरेदीकडे पाठ; स्थानिक कांद्याची आवक वाढल्याने विदेशी कांदा पडून

तुर्भे : विविध कारणांमुळे राज्यातील कांद्याची आवक कमी होत असल्याने या कांद्याने प्रति किलो 80 ते 100 रुपयांपर्यंत भाव गाठला. या परिस्थितीवर मात करण्यासाठी व्यापाऱ्यांनी इजिप्त व अफगाणिस्तानमधून कांदा मागवला. परंतु आता राज्यातील विविध ठिकाणांहून कांद्याची आवक वाढल्याने, विदेशातून आलेला कांदा सध्यातरी तसाच पडून आहे. विदेशातील हा कांदा वातानुकूलित यंत्रणेतून आल्याने त्यात पाणी साचत असल्याने तो खरेदी करण्यास व्यापारी अनुकूल नसल्याचे व्यापारी मनोहर तोतलानी यांनी सांगितले.

या वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने अनेक ठिकाणी कांदा पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे अपेक्षेइतका पुरवठा होत नव्हता. घाऊक बाजारात कांदा 40 ते 50 रुपये किलो, तर किरकोळ बाजारात कांदा 60 ते 80 रुपये किलो दराने विकला जात होता. म्हणून व्यापाऱ्यांनी इजिप्त व अफगाणिस्तानमधून कांदा मागवला.

सध्या 85 कंटेनर कांदा जेएनपीटी बंदरात दाखल झाला असून, त्यापैकी पाच कंटेनर कांदा मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेत पोहोचला आहे. सध्या सातारा, नाशिक व पुणे येथील विविध भागांतून रोज किमान 100 ट्रक कांद्याची आवक होत असल्याने घाऊक बाजारात कांदा 20 ते 25 रुपये दराने विकला जात आहे; तर दुसरीकडे विदेशातून आलेला कांदा हा वातानुकूलित यंत्रणेत असल्याने त्यात पाणी साठत आहे. 

हा कांदा वाळवल्यानंतर त्याचे वजन कमी भरणार असल्याने हा कांदा खरेदी करण्यास व्यापाऱ्यांनी अनुत्सुकता दर्शवली आहे. तसेच या कांद्यासाठी व्यापाऱ्यांसाठी किमान 25 ते 30 रुपये दर असल्याने त्याचा व्यापाऱ्यांना फटका बसण्याचीही शक्‍यता आहे. 

सध्या स्थानिक कांदा मोठ्या प्रमाणात येत असून, तुलनेने बाहेरील कांद्याचा भाव जास्त सांगितला जात आहे. त्यातच त्या कांद्यात पाणी साठत असल्याने तो वाळवला, तर वजनातही घट येईल. तसेच किमान भाव प्रति किलो 25 रुपयांहून अधिक असल्याने व्यापारी स्थानिक कांदा खरेदी करण्यास भर देत आहेत. विदेशातून आलेला कांदा हा मोठा असल्याने तो कांदा हॉटेल व्यावसायिकांसाठी योग्य आहे. 
- मनोहर तोतलानी,
व्यापारी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Foreign onion in Navi Mumbai