वनअधिकार्‍यांची 'सिंघम' स्टाईल

वनअधिकार्‍यांची 'सिंघम' स्टाईल

मुंबई : खारफुटीच्या जमिनींवर मातीचा भराव करून झोपडीमाफियांकडून ती जमीन बळकावण्याचे प्रकार वाढले आहेत. मालवणी येथील खारफुटीच्या जमिनीवर भराव करताना गुरुवारी पहाटे कांदळवन विभागाच्या वनाधिकाऱ्यांच्या पथकाने सिंघम स्टाईलने 17 जणांच्या टोळीला जेरबंद केले. वनाधिकारी आणि या टोळीदरम्यान दीड तास झटापट सुरू होती. कारवाईदरम्यान वनाधिकाऱ्यांच्या गाडीवर डम्पर घालण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो मोठ्या शिताफीने मोडून काढण्यात आला. 

महिन्यापूर्वी मालाड येथे अन्य टोळीला वनाधिकाऱ्यांनी पकडले होते. या टोळीच्या तपासामध्ये लंगुज रोड येथे बेकायदा खारफुटीच्या कत्तलीची माहिती कांदळवन अधिकाऱ्यांना मिळाली होती. आरोपींकडे शस्त्रास्त्रे असल्याची माहिती होती. त्यानुसार आज पहाटे कांदळवन अधिकाऱ्याने सापळा लावून लंगुज रोड येथे वनाधिकाऱ्यांनी सापळा लावून फिल्मी स्टाईलने कारवाई केली. खासगी वाहनांतून आलेल्या साध्या वेशातील वनाधिकाऱ्यांनी पहाटे 3.30 पासून पाळत ठेवली होती. ही टोळी सकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत खारफुटींची कत्तल करून त्यावर भराव टाकत असे. डम्परला जायला मार्ग मिळावा म्हणून त्यांच्या दोन दुचाकी अगोदर पुढे गेल्या. वनाधिकाऱ्यांनी या दुचाकीस्वारांना पुढे गेल्यावर पकडले. त्यानंतर मागून येणाऱ्या पाच डम्परना वनाधिकाऱ्यांच्या वाहनांनी अडवले. या वेळी वनाधिकाऱ्यांच्या वाहनांवर डम्पर घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वनाधिकारी त्वरित गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी बंदूक रोखली. त्यानंतर डम्पर थांबवण्यात आले. दोन तासांच्या झटापटीनंतर वनाधिकाऱ्यांनी सर्वांना पकडले.

कांदळवनाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक जयराम गौडा, कांबळे, उपवनसंरक्षक मकरंद घोडके, मुंबईच्या पश्‍चिम विभागाचे वनक्षेत्रपाल प्रशांत देशमुख; तसेच ठाणे फ्लेमिंगो खाडी अभयारण्य, नवी मुंबई वनक्षेत्रपालांचे पथक यांनी ही कारवाई केली. या कारवाईत तीन डम्पर, दोन दुचाकी आणि पंधरा आरोपींना पकडले गेले. सायंकाळपर्यंत त्यांची जबाव नोंदणी सुरू होती.

कांदळवन विभागाने आता खारफुटींवर भराव टाकणाऱ्यांचा माफियाराज बंद करायला सुरुवात केली आहे. मालवणीत पकडलेल्या या आरोपींना पर्यावरण संवर्धन कायद्यानुसार पाच वर्षांची शिक्षा होऊ शकेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

- एन. वासुदेवन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com