
Mumbai News : उद्या आम्ही तुम्हाला कुठे बसवू... माजी नगरसेविकाचा आक्रमक पवित्रा
मुंबई : मुंबई महानगरपालिकेत राजकीय पक्षांच्या कार्यालयांना सील केल्यानंतर त्या कार्यालयाबाहेरील आसन व्यवस्थाही पालिकेने हटवली आहे. त्यामुळेच पालिकेच्या या कृतीविरोधात माजी नगरसेविकेने आक्रमक पवित्रा घेत महापालिका प्रशासकांना खडे बोल सुनावले आहेत.
महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी शुभेच्छा देतानाच पालिका आयुक्त आणि प्रशासकांना संकेत देऊ केले आहेत. आज आम्हाला व्हरांड्यात बसवता, उद्या तुम्हाला आम्ही कुठे बसवू, अशा शब्दात भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री शिरवाडकर व्यक्त झाल्या आहेत.
आम्ही नारी, आमची काम करण्याची पद्धतीही न्यारी. आधी पक्ष कार्यालय बंद केले आणि आता तर कार्यालयाबाहेर बसण्याचे बाकडेही हटवले. पण प्रशासनाने लक्षात ठेवावे आम्ही लोकप्रतिनिधी नगरसेवक होतो आणि राहणार.
आम्ही जिथे बसतो तिथेच कार्यालय सुरू होते, अशा आशयाचे ट्विट शिरवाडकर यांनी केले आहे. कार्यालयाबाहेरील सोफे काढल्यानंतर आज पहिलाच दिवस हा पालिकेतील कामकाजाचा होता. ज्या माजी नगरसेवकांना जनतेच्या कामाच्या निमित्ताने पालिकेत यायचे आहे, अशा नगरसेवकांनी काम संपताच पालिकेतून बाहेर पडावे.
काम झाल्यानंतर पक्ष कार्यालयानजीक जमणार नाही याची खातरजमा करा. तसेच पालिका कार्यालयात शिरतानाच नगरसेवकांना कामाबाबतची विचारणा करूनच प्रवेश द्यावे, असेही तोंडी आदेश सुरक्षा रक्षकांना पालिकेकडून देण्यात आल्याचे कळते.
मुंबई महानगरपालिकेत पालिका प्रशासक सक्रीय झाल्यानंतर त्यांनी काही दिवस राजकीय पक्षांच्या कार्यालयांना सुरू ठेवण्यासाठी मुभा दिली होती. पण शिवसेना आणि उद्धव गट यांच्यातील कार्यालयाच्या ताब्याच्या प्रकारानंतर मात्र सुरूवातीला शिवसेना आणि त्यानंतर इतर राजकीय पक्षांची कार्यालयेही सील करण्याचा निर्णय पालिका प्रशासकांनी घेतला.
काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी पालिकेत पहारा देण्याची सुरूवात केली होती. परंतु पुढील वाद टाळण्यासाठी आता कामासाठीच माजी नगरसेवकांना प्रवेश देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय कोणत्याही प्रकारची आसनव्यवस्था पालिकेच्या पक्ष कार्यालयाबाहेर नसेल याचीही खबरदारी आता पालिका प्रशासनाने घेतली आहे.