माजी मंत्री पैसे वाटतोय...!

शुभांगी पाटील
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

याबाबत अनेकांनी माझ्याकडे विचारणा केली. बावखळेश्‍वर मंदिरात पैसेवाटप होत असल्याबाबतच्या अफवेवर नागरिकांनी विश्‍वास ठेवू नये. असा कोणताही प्रकार परिसरात घडलेला नाही.
- गणेश नाईक, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

नवी मुंबई - काळ्या पैशाविरोधातील लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने ५०० व हजारच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर एकीकडे आपल्याकडील ‘काळे उत्पादन’ प्रसंगी काही ‘शुल्क’ देऊन पांढरे करण्याच्या ‘उद्योगा’त काही मंडळी व्यग्र असतानाच, राज्याचा एक माजी मंत्री पैसे वाटत असल्याच्या अफवेने नवी मुबईत दोन दिवस धुमाकूळ घातला. या अफवेला बळी पडून शेकडो नागरिकांनी सोमवारी (ता.१४), मंगळवारी (१५) पावणे एमआयडीसी क्षेत्रानजीकच्या बावखळेश्‍वर मंदिरात मोठ्या रांगा लावल्या. रिकाम्या हाताने माघारी परतत असताना हीच मंडळी ‘हा माजी मंत्री कोण,’ याचीच चर्चा करत होते.

सोमवारी सायंकाळी ही अफवा पसरल्यानंतर ऐरोली, दिघा, इलठणपाडा, तुर्भे, तुर्भे नाका परिसरातील नागरिकांनी हातातले काम टाकून मिळेल त्या वाहनाने बावखळेश्‍वर मंदिराच्या दिशेने धाव घेतली. त्या ‘परोपकारी’ माजी मंत्र्याकडून पैसे मिळवण्यासाठी काहींनी आपल्या कच्च्या-बच्च्यांनाही रांगेत उभे केले. काहींनी व्हॉट्‌स ॲपवरूनही ही माहिती मित्रमंडळींना दिल्याने या गर्दीत भरच पडली. अनेक जण कुटुंबकबिल्यासह या रांगेत असल्याने पावणे गाव, वारली पाडा, तुर्भे परिसरातील झोपडपट्ट्या, दगडखाणीतील वस्त्यांवर सोमवारी सायंकाळी चिटपाखरूही दिसत नव्हते. 
रात्री आठनंतर बावखलेश्‍वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा नव्हती. अखेर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिस आल्यानंतरही गर्दी हटत नव्हती. 

पोलिसांनी दंडुका दाखवल्यानंतर मात्र ही गर्दी पांगली; मात्र सोमवारी सूर्यदर्शन होण्यापूर्वीच पुन्हा या परिसरात नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. अखेर या अफवेवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांना करावे लागले.

‘आधार कार्डधारकांनाच पैसे मिळणार’
ज्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड असेल, त्यांनाच पैसे मिळत असल्याची अफवाही या रांगेत पसरली होती. त्यामुळे काहींनी आधार कार्ड, पॅन कार्डच्या झेरॉक्‍स काढून पुन्हा रांगा लावल्या.

Web Title: Former Minister for money to distribution