बळिराजाला आता कर्जफेडीची चिंता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

पालघरसह ठाणे परिसरात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने या क्षेत्रातील भातशेतीवर पाणी फिरवल्याने बळिराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने धान्य खराब झालेच, शिवाय पावलीदेखील कुजल्याने आर्थिक तोटा झाल्याने सहकारी संस्था व बॅंकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, अशी चिंता शेतकऱ्याला पडली आहे.

बोर्डी: पालघरसह ठाणे परिसरात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने या क्षेत्रातील भातशेतीवर पाणी फिरवल्याने बळिराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने धान्य खराब झालेच, शिवाय पावलीदेखील कुजल्याने आर्थिक तोटा झाल्याने सहकारी संस्था व बॅंकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, अशी चिंता शेतकऱ्याला पडली आहे.

बोर्डी परिसरात शुक्रवारी (ता. १) रात्री ९ वाजल्यापासून शनिवारी (ता. २) पहाटेपर्यंत तुफान पाऊस झाल्याने शेतात पाणी साचून कापणी केलेले भात पीक बुडाले आहे. दिवाळीनंतर कापणीच्या कामाला वेग आला होता; मात्र पावसाने शेतकऱ्याच्या मेहेनतीवर पाणी फिरवले आहे. वर्षभर कुटुंबाला पुरेल इतके धान्य पिकवण्यासाठी मागच्या चार महिन्यांपासून केलेले कष्ट वाया गेले आहेत. चालू खरीप हंगामात बेसुमार पाऊस झाल्याने भाजीपाला व फळबागांवर प्रचंड दुष्परिणाम झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची व बागायतदारांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. 

वाणगाव, चिंचणी, तारापूर भागात शेडनेटखाली भाजीपाला घेणारे शेतकरी आपल्या जमिनीची मशागत करून लागवडीसाठी सज्ज झाले 
आहेत; मात्र रोपांची लागवड करण्यासाठी जमिनीला अनुकूल वापसा निर्माण होत नसल्याने 
नवीन भाजीपाला लागवडीस विलंब होणार आहे, अशी माहिती शेतकरी रामचंद्र सावे यांनी दिली.

कडधान्य पिकावरही संक्रांत
पावसाळी भातशेतीनंतर कडधान्याचे पीक घेतले जाते. त्याची पेरणी ऑक्‍टोबर व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणे आवश्‍यक असताना सध्या सतत पाऊस सुरू असल्याने कडधान्याचे पीक घेणे मुश्‍कील होणार आहे. त्यामुळे कडधान्य उत्पादनात मोठी घट होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मागच्या २० वर्षांपासून नारळावर सूक्ष्म कोळी कीटकाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाल्याने भविष्यात नारळाची उत्पादनक्षमता घटणार आहे. एकूणच शेतकऱ्याला या अस्मानी संकटाने ग्रासले असून शेती व बागायतीसाठी बॅंका सहकारी संस्थांच्या माध्यमातून घेतलेले कर्ज कसे फेडायचे असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

पुढील दोनतीन महिने चिकूचे उत्पादन मिळणार नसल्याने शेतमजुरांचा रोजगार तर बुडेलच, शिवाय त्यामुळे शेतकऱ्यालाही आर्थिक तंगीची झळ पोहोचणार आहे.
- विनायक बारी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former is now worried about debt repayments