माजी केंद्रीय अधिकाऱ्याचा विकसकाला चार कोटींचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - वादग्रस्त भूखंड कमी किमतीत मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून विकसकाची चार कोटींची फसवणूक करणाऱ्या माजी केंद्रीय अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. आपण तत्कालीन केंद्रीय मंत्र्याचा खासगी सुरक्षा अधिकारी (पीएसओ) आणि सनदी अधिकारी असल्याचे तो भासवायचा. 

मुंबई - वादग्रस्त भूखंड कमी किमतीत मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून विकसकाची चार कोटींची फसवणूक करणाऱ्या माजी केंद्रीय अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. आपण तत्कालीन केंद्रीय मंत्र्याचा खासगी सुरक्षा अधिकारी (पीएसओ) आणि सनदी अधिकारी असल्याचे तो भासवायचा. 

आशुतोष कुमार सिंग (वय 52), पत्नी मेनिका सहाय (48) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारदार राकेश जैन (61) यांची परिचयाच्या व्यक्तीमार्फत 2003 मध्ये राकेश त्रिपाठी याच्याशी ओळख झाली. तो जैन यांच्याकडे जमिनीचे प्रस्ताव आणायचा. त्याबदल्यात जैन त्याला दोन टक्के कमिशन द्यायचे. 2003 मध्ये त्रिपाठीने अंधेरीतील लोखंडवाला परिसरात तक्रारदाराला भेटायला बोलावले. त्या वेळी त्रिपाठीने जैन यांची सिंग याच्याशी ओळख करून दिली. सिंग आयपीएस अधिकारी असून त्यांच्याकडे न्यायालयीन वाद सुरू असलेले सरकारी भूखंड आहेत. ते सरकारी सेवेत असल्यामुळे अशा भूखंडांची कायदेशीर कागदपत्रे व इतर गोष्टींचा अडथळाही ते दूर करू शकतात, असे त्रिपाठी याने जैन यांना सांगितले. त्यानुसार जैन यांनी वर्सोवा दूरध्वनी केंद्र येथे सिंग याची कार्यालयात भेट घेतली. त्या वेळी सिंग याने आपण तत्कालीन केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांचे "पीएसओ' असल्याची भूलथाप मारली. 

ओशिवरा येथील यूटीआयची वादग्रस्त जमीन मिळवून देतो, तसेच माझ्या पत्नीची कंपनी या जागेचा विकासही करेल, असे आश्‍वासन सिंग याने जैन यांना दिले. त्या वेळी करारनाम्याकरिता सिंगने जैन यांच्याकडून दोन कोटी आणि त्यांच्या भागिदाराकडून दोन कोटी रुपये घेतले. त्यानंतर त्याने केंद्रीय मंत्रालयातील काही खात्यांची बनावट पत्रे तक्रारदाराला दिली. मात्र, खूप वर्षे होऊनही तेथे काम सुरू न झाल्याने अखेर जैन यांनी या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यानुसार सिंग आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

सिंग लाचखोर अधिकारी 
फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आशुतोष सिंग 2016 मध्ये हस्तव्यवसाय आणि हातमाग विभागात कार्यरत होता. त्या वेळी एका प्रकरणात तीन लाखांची लाच घेताना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्याला अटक केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

Web Title: Former Union officier Four crores fraud