Shivjayanti 2020 : प्रत्येक किल्ला सहन करतोय मानहानी... 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

ऐतिहासिक साक्षीदार अडकले प्रेमीयुगुलांच्या गराड्यात आणि टिकटॉक व्हिडीओच्या फेऱ्यात 
 

मुंबई : मुंबईच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले किल्ले यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे ढासळू लागले आहेत. किल्ल्यांचे जतन म्हणजे फक्त रोषणाई आणि स्वच्छता एवढाचा अर्थ सरकारी प्राधिकरणांनी घेतला आहे. त्यामुळे किल्ल्यांच्या तटबंदीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आज किल्ले म्हणजे प्रेमवीरांसाठी आडोसा, प्री-वेडिंग शूटिंगसाठीचे डेस्टिनेशन आणि "टिकटॉक' स्टारसाठी लोकेशन झाले आहेत. वांद्रे, शिवडी आणि वरळीतील किल्ल्यावर पुरातत्त्व विभागाचे सुरक्षा रक्षकही तैनात नाहीत, अशी परिस्थिती आहे. बुधवारी सर्वत्र शिवजयंती साजरी केली जाईल; पण किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 

मुंबईच्या इतिहासाचे साक्षीदार म्हणजे इथले किल्ले; मात्र ऐतिहासिक परंपरा जपण्याची सरकारी उदासीनता आणि बेफिकीर पर्यटकांच्या उपद्रवमूल्यामुळे आज त्यांची रया पार गेली आहे. मुंबईतील शीव आणि वांद्रे किल्ला सध्या वेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत आहे. दोन्ही किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात प्रेमीयुगुलांचा गराडा पाहण्यास मिळतो. महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा एकांत घालवण्याचा अड्डाच दोन्ही किल्ले बनले आहेत. दुसरीकडे किल्ल्याचा टिकटॉक व्हिडीओ बनवण्यासाठी वापर केला जात आहे. व्हिडीओच्या नादात मुले आपला जीवही धोक्‍यात घालत आहेत. किल्ल्यांच्या तुटलेल्या तटबंदीवर किंवा कठड्यावर चढून असे व्हिडीओ बनवले जात आहेत. वरळी आणि वांद्रे किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अ वर्गात आहे. माहीमचा किल्ला ब वर्गात आहे. 

शीव किल्ल्याच्या भिंतींवर गुटखाबाजांची रंगरंगोटी 

Image may contain: one or more people, shoes and outdoor

शीव किल्ला केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. किल्ल्याच्या बाजूला केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे कार्यालय आहे. किल्ल्यावर सुरक्षा रक्षकही तैनात आहे; तरीही तिथे सर्रास धूम्रपान, तंबाखू आणि गुटखा खाण्याचे प्रकार घडत असतात. किल्ल्याच्या प्रत्येक भागात "टिकटॉक'वीरांचा धुडगूस सुरू असतो. महाविद्यालयीन विद्यार्थी काही ना काही व्हिडीओ बनवतच असतात. सोमवारी शीव किल्ल्याला भेट दिली तेव्हाही दोन महाविद्यालयीन मुले शालेय विद्यार्थ्यांना घेऊन टिकटॉक व्हिडीओ बनवत होते. ती मुले व्हिडीओसाठी किल्ल्यामधील खोलीवरील चौथऱ्याच्या खिडकीवर चढली होती. चुकून तोल जाऊन खाली पडल्यास जीवाला गंभीर धोका होऊ शकतो, याची जाणीवच त्यांना नव्हती. जीव धोक्‍यात टाकून टिकटॉक व्हिडीओ बनवणाऱ्यांवर कोणाचाच वचक नाही. 
शीव किल्ल्याची तटबंदीही ढासळली आहे. अनेक भिंती ठिसूळ झाल्या आहेत. काही तुटल्या आहेत. तुटलेल्या जागा धोक्‍याच्या आहेत. शीव किल्ल्याच्या सर्वच भिंतींवर प्रेमीयुगुलांनी आपली नावे कोरून ठेवली आहेत. किल्ला पार विद्रूप करून टाकला आहे. एवढेच नाही, तर तुटलेल्या तटबंदीजवळ प्रेमीयुगुल बिनधास्त जाऊन बसतात. 

किल्ल्यावरील तोफ ऐतिहासिक घटनांची साक्ष देते; मात्र तोफेवरही सर्रास मुले बसलेली असतात; तरीही सुरक्षारक्षक त्यांना अडवत नाहीत. पुरातत्त्व विभाग कार्यालयाचेही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. एखादा अपघात झाल्यावर पुरतत्त्व विभागाचे डोळे उघडणार आहेत का, असा सवाल दुर्गप्रेमी करतात. किल्ल्याची सुरक्षा वाऱ्यावर आहे. भिंती आणि पायऱ्यांवर पान खाऊन टाकलेल्या पिंचकाऱ्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. महाविद्यालयीन तरुणही निर्लज्जपणे पान वा गुटख्याच्या पिचकाऱ्या किल्ल्यामध्ये टाकत असतात. इतकी वाईट परिस्थिती शीव किल्ल्याची झालेली आहे. 

वांद्रे किल्ल्याचा प्री-वेडिंग फोटोशूटसाठी वापर 

Image may contain: ocean, sky, tree, outdoor and nature

वांद्रे किल्लाही आज मानहानी सहन करीत आहे. वांद्रे किल्ल्याच्या भिंतीही प्रेमीयुगलांनी आपली नावे लिहून खराब केल्या आहेत. किल्ल्यावर कोपऱ्यामध्ये प्लास्टिकचा कचराही साचलेला पाहायला मिळतो. किल्ल्यांच्या काही भिंतींना भेगा पडल्या आहेत. काही भिंती तुटल्या आहेत. किल्ल्याच्या आडोशाला प्रेमीयुगुल तासन्‌ तास बसलेले असतात. जणू काही किल्ला त्यांच्यासाठीच आरक्षित आहे, अशी परिस्थिती आहे. किल्ल्यावर टिकटॉक व्हिडीओही बनवले जातात. प्री-वेडिंग आणि मॉडेलिंग फोटोशूटसाठीही त्याचा गैरवापर होत आहे. किल्ल्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. 

शिवडी किल्ला झाला गर्दुल्ल्यांचा अड्डा 

Image may contain: shoes and outdoor

शिवडी किल्ला मुळात खूप आत आहे. त्या ठिकाणी फार रहदारी नाही. किल्ल्यावर मुंबई महापालिकेने सप्टेंबर 2019 मध्ये विद्युत रोषणाई केली. किल्ल्याच्या भिंतीवरही नावे कोरल्याने त्याच्या सौंदर्यात बाधा येत आहे. किल्ला बऱ्यापैकी स्वच्छ आहे; परंतु तिथे चिटपाखरूही दिसत नाहीत. स्थानिक मुले टवाळकी करत असतात. तीच मुले तंबाखू खातात. किल्ल्यामध्ये झाडांच्या सुकलेल्या पानांचा पालापाचोळा पडलेला असतो. किल्ल्यावर चरस वा गांजा घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढू लागले आहे, असे दुर्ग संवर्धन करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. किल्ल्यावर प्रचंड शांतता आहे. चार-पाच टवाळकी करणारी मुले सोडली, तर फारसे किल्ल्यावर कोणी येत नाही. किल्ल्यावर एकट्याने येणे धोक्‍याचे आहे. खास महिलांनी इथे एकट्याने येणे टाळावे. किल्ल्याच्या काही पायऱ्या तुटल्या असून काही भिंतींची पडझड झाली आहे. किल्ल्याच्या उजव्या बाजूच्या मागील भागाची तटबंदी कोसळली आहे. 

वरळी किल्ल्यात व्यायामशाळा 

Image may contain: outdoor

वरळी किल्ल्याची देखरेख कोळीवाड्यातील स्थानिक रहिवासी करतात. त्यामुळे किल्ला स्वच्छ आहे. स्थानिक रहिवासी किल्ल्यावर योगासने वा व्यायाम करण्यासाठी येतात. मालिका वा चित्रपटांचे चित्रीकरणही किल्ल्यावर केले जाते. परिसरातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी किल्ल्यावर अभ्यास करण्यासाठी येतात. किल्ल्यावर वातावरण शांत आणि स्वच्छ आहे. पुरातत्त्व विभागाच्या नियमानुसार किल्ल्यांवर कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नाही; तरीही किल्ल्यावर व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. 

माहीमच्या किल्ल्यात प्रवेशबंदी 
माहीमचा किल्ला मुंबईतील सर्वात जुना म्हणून ओळखला जातो. 12 व्या शतकात हा किल्ला बांधला असल्याची शक्‍यता आहे; मात्र किल्ल्याचा ताबा आता वखारी आणि झोपड्यांनी घेतला आहे. थेट अरबी समुद्राला भिडणारा मुंबईतील हा एकमेव किल्ला. त्यामुळे समुद्राच्या बाजूची तटबंदी ढासळू लागली आहे. मात्र, त्यावर कोणतेही ठोस उपाय केले जात नाहीत. किल्ल्यात राहणाऱ्यांची मोठी दहशत असल्याने सरकारी अधिकाऱ्यांनाही प्रवेश नाकारला जातो. माहीमच्या किल्ल्यावर स्थानिकांनी अतिक्रमण करून आपली घरे बांधली आहेत. किल्ला अतिक्रमणांच्या विळख्यात आहे. 

वरळी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात चित्रीकरण केले जाते. चित्रीकरणासाठी पुरातत्त्व विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. चित्रीकरणासाठी पुरातत्त्व विभागाला निधी द्यावा लागतो; परंतु परवानग्या न घेताच चित्रीकरण केले जाते. शीव किल्ल्यावर 10 वर्षांत काम झालेले नाही. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रेमीयुगुले बसतात. चरस, गांजा आणि धूम्रपान करायला मुले जातात. त्या ठिकाणी पोलिसांचे पेट्रोलिंग होते; मात्र त्याचे प्रमाण कमी आहे. त्याकडे केंद्रीय पुरातत्त्व खात्याचेही लक्ष नाही. शिवडीच्या किल्ल्यावर असे प्रकार घडतात. किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी पुरातत्त्व खात्याने कठोर पावले उचलली पाहिजे. - गणेश रघुवीर, सह्याद्री प्रतिष्ठान, मुंबई विभाग 

forts of chatrapati shivaji maharaj are in worst state special report on shiv jayanti


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: forts of chatrapati shivaji maharaj are in worst state special report on shiv jayanti