गुंतवणूकदारांची 40 कोटींची फसवणूक 

अनिश पाटील
मंगळवार, 26 जून 2018

मुंबई - दीडपट परताव्याचे प्रलोभन दाखवून 40 कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार उपनगरातील सातशेहून अधिक जणांनी केली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौघांवर एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबई - दीडपट परताव्याचे प्रलोभन दाखवून 40 कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार उपनगरातील सातशेहून अधिक जणांनी केली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौघांवर एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करून चांगला परतावा दिला जाईल, अशी बतावणी या नागरिकांना करण्यात आली होती. याप्रकरणी नासीर शेख हे मुख्य तक्रारदार असून, रईसा पूनावाला, तिचा पती मुस्तफा बेग, तन्वीर शेख व निशा शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी 2012 ते 2017 दरम्यान सांताक्रूझ परिसरातील अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. काहींनी तर 50 हजार रुपयांपासून अगदी 40 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली आहे. आरोपींनी आर. सी. ट्रेडर्स नावाची कंपनी स्थापन करून अजमेर व वर्सोवा परिसरातील बांधकाम प्रकल्पांची योजना सांगितली होती. यात पैसे गुंतवून शंभर दिवसांत दीडपट रक्कम देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याला अनेक जण भुलले. सुरवातीला आरोपींनी परतावाही दिला; पण नंतर गुंतवणूकदारांना पैसे मिळणे बंद झाले. 

सांताक्रूझ पोलिसांनी अशाच प्रकारच्या एका गुन्ह्यात या आरोपींना अटक केली होती. त्यानंतर सर्व तक्रारदारांनी पुढे येऊन याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांकडे तक्रार केली. गुन्ह्याची रक्कम तीन कोटींच्या वर गेल्यामुळे नुकताच हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला. सध्या हे आरोपी दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून आतापर्यंत पाच लाख 86 हजारांची मालमत्ता जप्त केली आहे. आरोपींनी गुंतवणूकदारांची रक्कम कोठे गुंतवली, याबाबत तपास सुरू आहे. 

विनापावती व्यवहार 
या प्रकरणात फसवणूक झालेले सर्वजण गरीब व मध्यमवर्गीय आहेत. अनेकांनी कर्ज काढून आरोपींकडे पैसे दिले. काहींनी आपली घरे विकून पैसे गुंतवले आहेत. अनेकांनी त्यांची जन्मभराची कमाई कोणतीही पावती न घेता आरोपींच्या स्वाधीन केली. बहुतांश व्यवहार हा रोखीने झाला आहे. 

Web Title: forty crore fraud of investors in mumbai