आगीत चौघे मृत्युमुखी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबई - परळ येथील ‘क्रिस्टल टॉवर’ या १६ मजली इमारतीला बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत चौघे मृत्युमुखी, तर अग्निशमन दलाच्या चार जवानांसह १७ जण जखमी झाले. जखमींवर परळ येथील केईएम आणि ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इमारतीतील वायर डक्‍टला शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे. इमारतीतील अग्निप्रतिबंधक यंत्रणा बंद असल्याने ही आग झपाट्याने पसरल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

मुंबई - परळ येथील ‘क्रिस्टल टॉवर’ या १६ मजली इमारतीला बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत चौघे मृत्युमुखी, तर अग्निशमन दलाच्या चार जवानांसह १७ जण जखमी झाले. जखमींवर परळ येथील केईएम आणि ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इमारतीतील वायर डक्‍टला शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे. इमारतीतील अग्निप्रतिबंधक यंत्रणा बंद असल्याने ही आग झपाट्याने पसरल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

या इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील वायर डक्‍टमध्ये सकाळी ८.३०च्या सुमारास आगीची ठिणगी पडली. वायर डक्‍ट बंद नसल्याने आग वेगाने १६ व्या मजल्यापर्यंत पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीत अडकलेल्या ३० हून अधिक रहिवाशांना त्यांनी स्नॉर्केजच्या साह्याने बाहेर काढले; मात्र लिफ्टमध्ये इमारतीबाहेर पडण्याचा प्रयत्न करणारे अशोक संपत आणि संजीव नायर हे दोघे लिफ्टमध्ये अडकले. आगीमुळे त्यांच्या शरीराचा कोळसा झाला; तर इमारतीबाहेर पडता न आल्याने १२ व्या मजल्यावर राहणाऱ्या शुभदा शिर्के (६२) आणि हसन शेख यांचा गुदमरून मृत्यू झाला.

या इमारतीतील अग्निप्रतिबंधक यंत्रणा काम करत नव्हती. तेथील वायर डक्‍टही सील नव्हते, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांदळे यांनी दिली. अग्निशमन दलाने ही इमारत राहाण्यासाठी धोकादायक जाहीर केली असून ती रिकामी करण्यात आली आहे.

इमारत राहण्यासाठी धोकादायक असल्याने तेथील वीज-पाणी कापण्याची शिफारस आपत्कालीन नियंत्रण कक्षाला केली आहे. आगीची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होईल. वायरना आग लागल्यामुळे प्रचंड धूर पसरला होता. त्यामुळे बचावकार्य करणे आव्हानात्मक होते.
- प्रभात रहांदळे, प्रमुख अग्निशमन अधिकारी.

इमारतीला ओसी नव्हती
या इमारतीला ताबा प्रमाणपत्र मिळाले नव्हते. तरीही विकसक इस्माईल हाजी ईसा यांनी २०१२ मध्ये इमारतीचा ताबा रहिवाशांना दिला होता. पालिकेच्या नियमानुसार, ताबा प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय इमारतीत रहिवाशी राहू शकत नाही. त्यामुळे पालिकेने ऑक्‍टोबर २०१६ मध्ये ही इमारत रिकामी करण्याची नोटीस बजावली होती. त्यास विकसकाने न्यायालयात आव्हान दिले होते. शिंदेवाडी न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मावशीला वाचवू शकलो नाही
क्रिस्टल टॉवर इमारतीला आग लागल्याचे शुभदा शिर्के (वय ६५) या आपल्या मावशीने कळवले. लगेचच तिकडे धाव घेतली; पण तिला वाचवू शकलो नाही, अशी खंत जवळच राहणाऱ्या जयंत सावंत यांनी व्यक्त केली.

बाराव्या मजल्यावर मावशीचे घर होते. आपण कसेबसे तेथे पोहचलो. तेथे अडकलेल्या चार जणांना आपण वाचवले; मात्र मावशी कुठेच सापडली नाही. आग वाढू लागल्यामुळे अकरावा मजला गाठला. तेथून खाली उतरणे कठीण झाले. अखेर खिडकीची जाळी तोडून अग्निशमन दलाकडे मदत मागितली. गुदमरू लागलो होतो. अखेर अग्निशमन दलाची मदत पोहचली. खिडकीची जाळी तोडताना बरगड्यांना दुखापत झाली आहे, असे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभदा यांच्या पश्‍चात मुलगी शुभश्री, मुलगा तेजस असा परिवार आहे. तेजस भारतीय लष्करात आहे. त्यांना आईची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे, असे शुभदा यांच्या नातेवाइकांनी सांगितले. तेजल आल्यानंतर मुलगी शुभश्री यांच्या घरी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ईदच्या शुभेच्छा देण्यापूर्वीच मृत्यूचे अलिंगन
दादर येथील क्रिस्टल टॉवरला राहणारे सजीव नायर मूळचे वसईचे. परळला आपल्या दुकानात जाण्यापूर्वी क्रिस्टल टॉवरमध्ये राहणाऱ्या मित्राला बकरी ईदनिमित्त शुभेच्छा द्यायला ते गेले; मात्र त्याच वेळी आग लागल्याने ते लिफ्टमध्ये अडकले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

आपल्या मित्राला शुभेच्छा देण्यासाठी सकाळी ६ वाजताच सजीव यांनी क्रिस्टल टॉवर गाठले. मित्राला अलिंगन देत बकरी ईदच्या शुभेच्छा देण्याअगोदरच त्यांना मृत्यूने अलिंगन दिले. नायरसारखीच गोष्ट घडली ती हसन शेखची. हसन हा झवेरी बाजारात राहणारा. तिथेच त्याचा दागिन्यांचा व्यवसाय होता. क्रिस्टल टॉवरमध्ये तेराव्या मजल्यावर राहणाऱ्या अझरुद्दीनसह बकरी ईद साजरी करण्याचे ठरवले. त्यासाठी हसनसह त्याचा मित्र जहांगिरही सोबत आला. आज सकाळी आग लागली तेव्हा हसन घराबाहेर पळाला. हसनसोबत असणाऱ्या जहांगिरला मात्र मजल्यावरील इतर शेजाऱ्यांनी अडवले. हसनचा भाऊ अझरुद्दीन मात्र घरातील रुममध्ये झोपला होता. त्याने रूम बंद केली. हे दोघेही वाचले; परंतु घराबाहेर पळालेला हसन स्वतःला वाचवू शकला नाही.

Web Title: four dead in the Crystal Tower building fire