कांदिवलीतील आगीत चौघांचा होरपळून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

मुंबई - कांदिवली येथे रविवारी (ता. 23) गारमेंटला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी (ता. 24) पहाटे त्यांचे मृतदेह सापडले. राजू विश्‍वकर्मा (वय 30), राजेश विश्‍वकर्मा (36), भावेश पारेख (51) आणि सुदामा सिंग (36) अशी मृतांची नावे आहेत. गारमेंटमध्ये बेकायदा मजल्याचे बांधकाम सुरू होते. त्या वेळी वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी उडाल्याने आग लागल्याचे बोलले जात आहे; मात्र अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अग्निशमन दलाने सोमवारी घटनास्थळाची पाहाणी करून काही नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

कांदिवलीतील दामूनगरमधील गारमेंटमध्ये काल आग लागली. यात बेकायदा मजला बांधण्यासाठी वेल्डिंगचे काम सुरू होते. त्याची ठिणगी कपड्यांचा रंग असलेल्या पिंपावर उडाली आणि त्यातून आगीचा भडका उडाला, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीमुळे गोदामाचे बांधकाम कोसळले. त्यानंतर जेसीबी आणि इतर यंत्राच्या साह्याने पहाटेपर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते. पहाटे या चौघांचे मृतदेह सापडले.

मालवणीतही आगीचा भडका
मालवणी येथील गावदेवी मंदिराजवळ रविवारी मध्यरात्री आग लागून चित्रीकरणाच्या साहित्याचे गोदाम आणि दुचाकी गाड्यांचे सुटे भाग बनवणारी अल्ट्रागार्ड कंपनी खाक झाली. तसेच आजूबाजूच्या इतर गाळ्यांनाही आग लागली. या गाळ्यांना लागूनच रहिवासी वस्ती आहे. त्यामुळे काही घरांनाही आगीची धग पोचली. यात जीवितहानी झाली नसली, तरी वित्तहानी मोठी झाल्याचे समजते.

Web Title: four death in fire