हुंड्यासाठी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह चौघांना कारावास

हुंड्यासाठी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह चौघांना कारावास



नवी मुंबई : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीसह सासू, सासरे आणि दीर या चौघांना न्यायालयाने 5 वर्षे सश्रम कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सप्टेंबर 2013 मध्ये नेरूळ भागात ही घटना घडली होती.

या खटल्यात शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये पती नरेशकुमार सुकनराज कोठारी, सासरे सुकनराज कोठारी, सासू मुनियाबेन कोठारी आणि दीर हितेश कोठारी या चौघांचा समावेश आहे. तर मृत विवाहितेचे नाव इंदुकुमारी नरेशकुमार कोठारी (38) असे आहे. नेरूळ भागात राहणाऱ्या कोठारी कुटुंबीयांनी हुंड्यासाठी इंदुकुमारी हिचा छळ सुरू केला होता. सासरकडच्या मंडळींच्या सततच्या छळाला कंटाळून इंदुकुमारी हिने 30 सप्टेंबर 2013 रोजी आपल्या दोन्ही मुलांसमोर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मृत इंदुकुमारी हिच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून नेरूळ पोलिसांनी चौघांना अटक केली होती.

त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सुरेश मल्लाव यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून ठाणे सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी ठाणे येथील सत्र न्यायालयात सुरू होती. खटल्यामध्ये एकूण 7 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यात मृत इंदुकुमारी हिची 13 वर्षीय मुलगी आणि 7 वर्षीय मुलगा या दोघांची साक्ष महत्त्वाची ठरली.

त्यानंतर सरकारी अभियोक्ता वर्षा चंदने यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद, तसेच दाखल केलेले साक्षीपुरावे ग्राह्य धरून गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. पंढरीकर यांनी चौघा आरोपींना हुंडा प्रतिबंधक कायदा कलम 3 व 4 तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकणी दोषी ठरवून चौघांना 5 वर्षे सश्रम कारावास, तसेच प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्याच्या न्यायालयीन कामकाजात पोलिस हवालदार प्रभाकर महाजन यांनी मदत केली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com