घरफोड्या करणारे चौघे गजाआड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

राजेश हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. एका गुन्ह्यात शिक्षा भोगताना त्या चौघांची तुरुंगात मैत्री झाली. त्या चौघांनी चार वर्षांपूर्वी बोरिवली पूर्व येथील एका कारखान्यातून डी. जे. सिस्टम चोरली होती. तुरुंगात सोबत राहिल्यावर ते महिन्याभरापूर्वी बाहेर आले होते.

मुंबई : घरफोड्या करणाऱ्या टोळीतील चार जणांना वनराई पोलिसांनी अटक केली आहे. राजेश उर्फ बबन कदम, राकेश भदई यादव, आलम अब्दुल वहाब, ध्रुव रामप्रसाद गुप्ता अशी या चौघांची नावे आहेत. या टोळीविरोधात मुंबई, विरार, नालासोपारा येथे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी कारवाई करून 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

दहा दिवसांपूर्वी गोरेगाव पूर्वच्या संगम मेटल दुकानातून चोरट्यांनी 6 लाख 60 हजारांचा ऐवज चोरला होता. या चोरीप्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिमंडळ 12 चे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, सहायक आयुक्त ज्ञानेश्‍वर जवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरिक्षक ज्योत्सना रासम यांच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे गुरुवारी (ता.26) दहिसर चेकनाका येथून चार जणांना ताब्यात घेतले. चौघांनी घरफोडीची कबुली दिली. चारही आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. 

तुरुंगातून सुटल्यावर चोऱ्या 

राजेश हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. एका गुन्ह्यात शिक्षा भोगताना त्या चौघांची तुरुंगात मैत्री झाली. त्या चौघांनी चार वर्षांपूर्वी बोरिवली पूर्व येथील एका कारखान्यातून डी. जे. सिस्टम चोरली होती. तुरुंगात सोबत राहिल्यावर ते महिन्याभरापूर्वी बाहेर आले होते. टोळीतील प्रत्येकावर गुन्हे दाखल आहेत. या टोळीने मुंबई, विरार, नालासोपारा येथे चोऱ्या केल्या आहेत. 
 

 
 

Web Title: Four robbers are arrested