फेरीवाल्यास मारहाण करून लुटणाऱ्या चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

न्हावा शेवा पोलिसांची कारवाई

उरण : पनवेल तालुक्‍यातील गव्हाण गावात फेरी करून साड्यांची विक्री करणाऱ्या मनिरुल हशरथ शेख (४७) यांना दमदाटी करून त्यांच्या हातावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या चौघा आरोपींना न्हावा-शेवा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

मनिरुल हशरथ शेख हे पनवेल तालुक्‍यातील आणि न्हावा-शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाण गावात फिरून साड्यांची विक्री करत असताना, साड्या विकत घ्यायच्या असल्याचे सांगून आरोपी आशुतोष भरत कोळी, तुषार चंद्रकांत कोळी, परेश नथुराम कोळी व साहील सदानंद कोळी (सर्व रा. गव्हाण, ता. पनवेल) यांनी शेख यांना सोबत येण्यास सांगितले; मात्र शेख यांनी चौघांसोबत जाण्यास नकार दिल्यावर शेख यांना दमदाटी करून चौघांनी त्याच्या हातावर धारदार चाकूने वार केले.

त्यानंतर त्यांना जबरदस्तीने गव्हाण येथील जंगलातील निर्जनस्थळी असलेल्या एका खोलीत डांबून ठेवून त्यांना लाकडी दांडक्‍याने व कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. शेख यांना चौघांनी लाथाबुक्‍क्‍याने मारहाण करून त्यांच्याकडील सात हजार ४०० रुपये किमतीच्या साड्या व रोख रक्कम १७०० असे एकूण नऊ हजार १०० रुपये किमतीचा माल हिसकावून घेतला. शेख यांनी त्याबाबत न्हावा-शेवा पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भा.दं.वि. ३९४, ३४२ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली.

याप्रकरणी न्हावा-शेवा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पंडित पाटील तपास करीत आहेत; तर या आरोपींना शिताफीने अटक करण्यासाठी पोलिस कर्मचारी राजेंद्र बोराटे, प्रमोद पाटील, प्रसाद वायगंकर, रूपेश पाटील, रूपेश दराडे व गणेश सोंडे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four robbers arrested in Nhava-Sheva