इमारतीचा स्लॅब कोसळल्याने चार वर्षीय चिमुरडा दगावला; महिला जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत यांनी ही इमारत खाली केली आहे. इमारत अतिधोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती, अशी माहिती गणेश शिंपी यांनी दिली.

उल्हासनगर : आज (रविवार) सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरातील एका इमारतीचा पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर कोसळल्याने त्याखाली सापडल्याने चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे. पालिकेच्या वतीने ही इमारत खाली करण्यात आली असून ऐन पावसाळ्यात 24 कुटुंब बेघर झाले आहेत. एकाच्या दुर्लक्षाची शिक्षा तमाम रहिवाशांना भोगण्याची वेळ आली आहे.

कॅम्प नंबर 3 पवई चौकात अंबिका सागर ही पाच मजल्याची इमारत असून ती 1992 साली उभारण्यात आली आहे. या इमारतीत तात्याराव सातपुते यांची पत्नी पंचशिला, मुलगा सत्यजीत, सून श्रेया, एकुलता एक नातू निरज व लहान मुलगा विश्वजीत असे कुटुंब 2007 पासून चौथ्या मजल्यावर राहत आहेत. आज सकाळी निरज हा त्याची आजी पंचशिला सोबत झोपलेला असताना पाचव्या मजल्याचा स्लैब त्यांच्या अंगावर कोसळला. त्यात 4 वर्षीय निरज जागीच ठार झाला, तर पंचशिला या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्या. आजोबा तात्याराव हे त्यांचा नातू निरजचे पार्थिव हातात घेऊन जिण्यावरुन उतरत असताना रहिवाशांचे डोळे पाणावले.

ही घटना समजताच नगरसेवक राजेंद्र चौधरी, मनोहर (पप्पू) बेहनवाल, पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत, अग्निशमन दल यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या पंचशिला सातपुते यांना बाहेर काढले. त्यांना मोठ्या प्रमाणात मुका मार लागला आहे.

एकाच्या दुर्लक्षाची शिक्षा रहिवाशांना भोगण्याची वेळ
पाचव्या मजल्यावरील 501 नंबरचा फ्लैट हा रमेशचंद्र नागदेव यांच्या नावावर आहे.पूर्वी तिथे भाडेकरी राहत होते. मात्र, स्लॅब व्यवस्थित नसल्याने एका वर्षापासून तिथे कुणी राहत नाही. रहिवाशांनी त्यांना स्लैब दुरस्त करण्यास सांगितले होते. मात्र आज-उद्या म्हणत ते वेळ काढून नेत होते. शेवटी आज हा स्लॅब कोसळला आणि त्यात माझ्या जुनियर केजीमध्ये शिकणाऱ्या गोंडस नातवाचा बळी गेला, असा आरोप पंचशिला सातपुते यांनी करून नागदेव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. नागदेव यांनी केलेल्या दुर्लक्षाची शिक्षा आम्हा सर्वांनाच भोगण्याची वेळ आली. असा टाहो रहिवाशांनी फोडला.

पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, भगवान कुमावत यांनी ही इमारत खाली केली आहे. इमारत अतिधोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती, अशी माहिती गणेश शिंपी यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four year old boy dead and woman injured in collapse of building slab