कडोंमपात 535 कोटींचा घोटाळा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रेंचा आरोप; कारवाईची मागणी 

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगररचना विभागातील अधिकारी, कर निर्धारक आणि संकलन विभागातील अधिकारी यांनी संगनमत करून तब्बल 535 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे, असा आरोप सत्ताधारी शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. आर्थिक डबघाईला आलेल्या पालिकेला गैरव्यवहारात अडकलेला निधी परत मिळवून देण्यासाठी लढा देत राहीन, असा निर्धारही त्यांनी व्यक्‍त केला. 

म्हात्रे यांनी मुख्यालयातील पत्रकार कक्षात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी त्यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळवलेली गैरव्यवहाराची आकडेवारी सादर केली. कर थकबाकी असताना 1853 बिल्डर, विकसक, वास्तुविशारद यांच्याशी संगनमत करून इमारतींना पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला. त्यातून पालिकेचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडाला. हा मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला. बांधकाम व्यावसायिकांना पालिकेचे देय असलेले सर्व कर भरून इमारत बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घ्यावा लागतो; मात्र थकबाकी असतानाही प्रशासन, लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या संगनमताने हा दाखला देण्यात आल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाल्याचा दावा म्हात्रे यांनी केला. या घोटाळ्याचा विषय दहा ते बारा वेळा महासभेत मांडण्याचा प्रयत्न केला होता; मात्र एकही नगरसेवक अनुमोदक मिळाला नाही. जोपर्यंत मी नगरसेवक म्हणून कार्यरत असेन, तोपर्यंत हा निधी महापालिकेला परत मिळवून देईन. यासाठी कुणाचा पाठिंबा मिळाला नाही, तरी मी एकटा ही लढाई लढणार आहे, असेही म्हात्रे यांनी या वेळी स्पष्ट केले. 

एसीबी चौकशी व्हावी 
घोटाळ्यात सहभागी असलेले पालिका अधिकारी व अन्य संबंधितांवर फौजदारी तसेच एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल करावेत. या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी व्हावी. घोटाळ्याचा खटला जलदगती विशेष न्यायालयात चालवण्यात यावा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. 

वामन म्हात्रेंनी काय आरोप केले, याची मला कल्पना नाही. आम्ही कायद्याला धरूनच तसेच सर्व बाबी तपासून इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देतो. त्यामुळे घोटाळ्याचा प्रश्‍नच नाही. म्हात्रेंनी घोटाळ्याचा आरोप पुराव्यासह सिद्ध करावा. 

- सुरेंद्र टेंगळे, नगररचनाकार, कल्याण-डोंबिवली महापालिका. 
 

Web Title: fraud in kalyan dombivali corporation