बनावट मोबाईल ऍप्लिकेशनच्या साह्याने फसवणूक! 

Mobile-application
Mobile-application

मुंबई : मोबाईल ऍप्लिकेशनच्या मदतीने तिकीट काढताना एका तरुणास एक लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या नावाने बनावट ऍप्लिकेशन तयार करून हा प्रकार केल्याचा संशय असून त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. 

तक्रारदार प्रभादेवी परिसरातील रहिवासी आहेत. त्यांनी गुरुवारी प्रसिद्धी ट्रॅव्हल्स मोबाईल ऍप्लिकेशनच्या साह्याने हैदराबादपासून मुंबईपर्यंतचे विमानाचे तिकीट काढले होते. त्या वेळी त्यांच्या खात्यातून तिकिटाची रक्‍कम वजा झाली; मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही. अखेर त्यांनी त्याच ऍप्लिकेशनवरून ग्राहक केंद्राशी चॅटिंगद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे या तरुणीने गुगलवरून ग्राहक केंद्राचा मोबाईल शोधून त्यावर संपर्क केला. त्या वेळी तो क्रमांकही व्यस्त होता. त्यामुळे या तरुणीचा संपर्क होऊ शकला नाही. 

काही वेळाने भलत्याच क्रमांकावरून या तरुणीला दूरध्वनी आला. त्या वेळी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण तिकीट काढलेल्या पोर्टलवरून बोलत असल्याचे सांगितले. त्या वेळी या तरुणीने खात्यातून रक्कम गेल्यानंतरही तिकीट मिळाले नसल्याचे त्याला सांगितले. त्याच्या काही वेळानंतर या तरुणीच्या व्हॉट्‌स ऍपवर या एक्‍झिक्‍युटीव्हने विमानाचे तिकीट पाठवले. त्यानंतर दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने त्या तिकिटाची रक्कम या तरुणीकडे मागितली. त्या वेळी तिने नकार देत आपण यापूर्वीच तिकिटाचे पैसे भरल्याचे सांगितले. त्या वेळी दूरध्वनी करणाऱ्या एक्‍झिक्‍युटिव्हने ही रक्कम भरल्यास पूर्वीची रक्कम परत मिळेल असे सांगितले. त्या वेळीही या तरुणीने पैसे भरण्यास नकार दिला. त्या वेळी त्या एक्‍झिक्‍युटिव्हने तुम्ही तिकिटासाठी भरलेली रक्कम त्यांच्याच खात्यातील आहे का? असे विचारले. त्या वेळी तरुणीने होकारार्थी उत्तर दिल्यानंतर त्याने दूरध्वनी ठेवला. 

मोबाईल क्रमांक मिळवून फसवणूक 

त्यानंतर तक्रारदार कार्यालयीन बैठकीत व्यस्त असल्यामुळे तासभरानंतर मोबाईल पाहिला आणि तिला धक्काच बसला. तिच्या खात्यातून यूपीआयच्या माध्यमातून सात विविध व्यवहारांच्या साह्याने पेटीएम खात्यात एक लाख रुपये वळते केल्याचे समोर आले. तक्रारदार तरुणीला याप्रकरणी त्या कंपनीच्या अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा संशय आहे. दुसरीकडे पोलिस मात्र सायबर आरोपींनी बनावट मोबाईल ऍप्लिकेशन तयार केल्याचा संशय व्यक्त करत आहेत. असे बरेच बनावट ऍप्लिकेशन सध्या सुरू आहेत. त्या माध्यमातून मोबाईल क्रमांक व खात्याची माहिती घेऊन पैसे काढले जात आहेत. 

बनावट ऍप्लिकेशनच्या माध्यमातून असे प्रकार केले जातात. सध्या अनेक बॅंकांच्या नावानेही बनावट ऍप्लिकेशन सुरू आहेत. त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर संबंधित बॅंक अथवा कंपन्यांनी तत्काळ तक्रार करून अशी बनावट ऍप्लिकेशन बंद करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत; जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही. 
- अॅड. विकी शहा, सायबर तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com