
Mumbai Crime : 'वर्क फ्रॉम होम' नोकरीच्या शोधात महिलेची ऑनलाईन फसवणूक; पंतनगर पोलिसात गुन्हा दाखल
मुंबई : ऑनलाइन पद्धतीने ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सुविधा असलेल्या कंपनीतील नोकरीच्या शोधात असलेल्या घाटकोपर येथील एका 32 वर्षीय महिलेची 4 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी तपास सुरू केला असून सायबर फसवणूक करणाऱ्याचा शोध घेत आहेत. गरोदर असल्यामुळे सदर महिला घरातून कार्यालयीन काम करता येईल अशा नोकरीच्या शोधात होती.
तक्रारदार महिला पूर्वी ई-कॉमर्स कंपनीत काम करीत होती. गरोदर राहिल्यामुळे तिने नोकरी सोडली. तिने नोकरीसाठी एका संकेतस्थळावर आपली माहिती उपलब्ध केली होती. त्यानंतर तिला एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सॲपवर एक संदेश आला. तिने टेलिग्राम मेसेंजरवर एखादे काम पूर्ण केल्यास तिला 150 रुपये मिळतील, असे या संदेशात नमुद करण्यात आले होते.काम योग्य वाटल्यामुळे ती टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी झाली.
दिलेले काम पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला तिला कमिशन मिळाले. नंतर तिने आणखी कार्ये पूर्ण केली, कार्यांचा भाग म्हणून ऑनलाइन उत्पादने खरेदी केली आणि तिच्या व्हर्च्युअल वॉलेटमध्ये पैसे जमा केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. सायबर भामट्यांवर विश्वास ठेऊन त्यांनी सांगितलेल्या सूचनांचे तिने पालन केले आणि विविध वस्तू खरेदी केल्या. काही उत्पादने खरेदी करण्यासाठी तिला यूपीआय आयडीद्वारे खात्यात पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले.
तक्रारीनुसार, महिलेने एकूण 4 लाख 82 हजार रुपये खर्च केले आणि तिला कंपनीतर्फे पैसे मिळण्याची ती वाट पाहत होती. खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे तिने याबाबत चौकशी केली असता एकूण 7 लाख 92 हजार रुपये कमिशन मिळवण्यासाठी आणखी दोन लाख रुपये जमा करण्याची सूचना तिला करण्यात आली.
आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिने पंतनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.पंतनगर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्ह्यात वापरलेले मोबाइल क्रमांक, बँक खाती, यूपीआय आयडी आणि ई-वॉलेटचा तपशील मिळविण्यासाठी पोलिसांनी संबंधित कंपन्यांना पत्र पाठवले आहे.