वाशीतील पालिका रुग्णालयात मोफत जेवण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

तुर्भे - वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येणारे गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडे पैसे नसल्याने आणि मुंबईत नातेवाईक नसल्याने पदपथावरच राहावे लागते. पैशांअभावी कधी वडापावावर; तर कधी उपाशी दिवस काढावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन "आधार फाऊंडेशन'ने या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत भोजनावळ सुरू केली आहे. त्यामुळे या गरिबांसाठी ही संस्था आधारवड ठरत आहे. 

उपचारांसाठी घर, जमीन गहाण टाकून त्यांचे नातेवाईक मुंबईत येतात. मुंबईत नातेवाईक नसल्याने आणि हॉटेल-लॉजवर राहण्यासाठी खिशात पैसे नसल्याने हे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक पदपथावरच झोपतात. ज्यांच्याकडे थोडे पैसे आहेत, ते तेथेच चुलीवर डाळ-भात बनवून खातात. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ते वडापाव खाऊन; तर कधी उपाशीच दिवस काढतात. अशा आर्थिक दुर्बल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी आधार फाऊंडेशनने पालिका रुग्णालयात मोफत भोजनावळ सुरू केली आहे. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. 

देशाच्या अनेक राज्यांमधून आणि विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, आसाम आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात चांगली रुग्णालये नाहीत. त्यामुळे असाध्य रोगांवरील उपचारांसाठी तेथील रुग्ण मुंबईत येतात. यात काही जण उपचारासाठी घर आणि जमीन विकून आलेले असतात. असेच काही रुग्ण नवी मुंबईतही उतरतात. मात्र येथे राहण्याची सोय नसल्याने ते पदपथावर राहतात. यातील अनेकांना दोन वेळचे जेवणही मिळत नाही. त्यांच्यासाठी आधार फाऊंडेशनने मोफत खानावळ सुरू केली आहे. आधार फाऊंडेशनच्या वतीने दोन वर्षांपासून ऐरोली ते बेलापूरपर्यंत गरीब रुग्णांसाठी दोन रुग्णवाहिका मोफत सेवा देत आहेत. दिव्यांग मुलांना शालेय वस्तूंचे वाटप आदी उपक्रम राबवले जात आहेत. 

गरीब रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पालिका रुग्णालयातून जेवणाचे टोकन दिले जाते. त्यावर त्यांना सेंट मेरीज शाळेसमोरील आधार फाऊंडेशनच्या भोजनावळीत मोफत जेवण दिले जाते. ही भोजनावळ सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू असते. 
- मधुकर शिंदे, अध्यक्ष, आधार फाऊंडेशन 

Web Title: Free meal at Vashi Municipality hospital