फ्री होल्डवरून राष्ट्रवादी - भाजपमध्ये श्रेयवाद! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

नवी मुंबई - नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्ये सुरू असलेली धुसफूस पुन्हा एकदा फ्री होल्डच्या मुद्द्यावरून बाहेर आली. सिडको अधिग्रहित जमिनींवर वसलेल्या वसाहती व भूखंड फ्री होल्ड करण्याला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर हे श्रेय आपले असल्याचे सांगण्यास भाजपने सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे "कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ झाली', असे म्हणत माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपच्या श्रेयाची खिल्ली उडवली. 

नवी मुंबई - नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्ये सुरू असलेली धुसफूस पुन्हा एकदा फ्री होल्डच्या मुद्द्यावरून बाहेर आली. सिडको अधिग्रहित जमिनींवर वसलेल्या वसाहती व भूखंड फ्री होल्ड करण्याला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर हे श्रेय आपले असल्याचे सांगण्यास भाजपने सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे "कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ झाली', असे म्हणत माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपच्या श्रेयाची खिल्ली उडवली. 

आघाडी सरकार असताना सिडकोसोबत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीने सर्वांत आधी केलेल्या फ्री होल्डच्या मागणीला सिडकोने होकार दिला होता, अशी प्रतिक्रिया गणेश नाईक यांनी वाशीत पत्रकारांना दिली. सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केल्यापासून आतापर्यंत नागरिकांसाठी निर्माण केलेल्या वसाहती, सामाजिक संघटनांना दिलेले भूखंड, साडेबारा टक्के योजनेतील भूखंड हे सर्व 60 व 90 वर्षांच्या लीजवर देण्यात आले होते. त्यामुळे रहिवाशांना मालकी हक्क नसल्याने त्यांच्या इमारतींची दुरुस्ती, घरे व भूखंडांची खरेदी-विक्री करता येत नव्हती. प्रत्येक वेळी सिडकोच्या ना हरकत दाखल्याची गरज नागरिकांना लागत होती. म्हणून सिडकोनिर्मित सोसायट्या, वसाहती फ्री होल्ड करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईसह, पनवेल, उरणकरांची होती. 

फ्री होल्ड हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असल्याने सर्व राजकीय पक्षांनी त्याला हवा दिली होती. मात्र, आघाडी सरकारच्या काळात जे राष्ट्रवादीला जमले नाही, ते भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत मागणी मान्य करून घेतल्याने, फ्री होल्ड आपणच केल्याचा दावा भाजपसमर्थकांनी केला आहे. त्याला जनतेमधूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने राष्ट्रवादीनेही या श्रेयवादात उडी घेऊन फ्री होल्ड करण्याची मागणी सर्वांत आधी राष्ट्रवादीने केल्याचा दावा माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी केला आहे. वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयाचा दौरा करताना पत्रकारांना गणेश नाईकांनी ही प्रतिक्रिया दिली. 

हे श्रेय आमचे असून, आम्हीच सर्वांत आधी सिडकोकडे बैठक घेऊन फ्री होल्डची मागणी केल्याचा पुनरुच्चार नाईकांनी केला. तर नाईक परिवारानंतर सोशल मीडियावरही नाईकसमर्थक व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून फ्री होल्डचे श्रेय नाईक घराण्याचे असल्याचे ठामपणे सांगितले जात आहे. दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांकडून हा मुद्दा खोडून काढण्यासाठी वेगवेगळे हातखंडे आजमावले जात आहेत. 

गेली 15 वर्षे आघाडीची सत्ता असताना नवी मुंबई फ्री होल्ड करणे राष्ट्रवादीला का जमले नाही? सर्वच पदे एकाच घरात असूनही राष्ट्रवादीला जे करता आले नाही, ते भाजपने करून दाखवल्याने राष्ट्रवादीमध्ये पोटशूळ उठला आहे. परंतु, जनता सज्ञान असून कोणी मुद्दा तडीस नेला हे जनतेला कळते. 
- मंदा म्हात्रे, आमदार

Web Title: freehold issue NCP- BJP