ऐरोली रुग्णालयासमोरील नो पार्किंगचे फलक नावापुरतेच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

ऐरोली सेक्‍टर तीन येथे नवी मुंबई महापालिकेचे राजमाता जिजाऊ रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या बाहेर पालिकेने नो पार्किंगचे फलक उभारले आहे; मात्र या नो पार्किंगच्या फलकाजवळच बिनधास्तपणे वाहने पार्क करण्यात येतात. यामुळे रुग्णालयाबाहेर वाहतुकीस अडथळा निर्माण होतात; तर रुग्णालयात आलेल्या रुग्णासह पादचाऱ्यांना या वाहने पार्किंगचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नवी मुंबई ः ऐरोली सेक्‍टर तीन येथे नवी मुंबई महापालिकेचे राजमाता जिजाऊ रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या बाहेर पालिकेने नो पार्किंगचे फलक उभारले आहे; मात्र या नो पार्किंगच्या फलकाजवळच बिनधास्तपणे वाहने पार्क करण्यात येतात. यामुळे रुग्णालयाबाहेर वाहतुकीस अडथळा निर्माण होतात; तर रुग्णालयात आलेल्या रुग्णासह पादचाऱ्यांना या वाहने पार्किंगचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महापालिकेने ऐरोली, सेक्‍टर ३ जवळ १०० खाटांचे मध्यवर्ती रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात दिघा, रबाले, गोठिवली, ऐरोली या परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने येतात. या रुग्णालयात गर्भवती महिलांची प्रसूतीदेखील करण्यात येते. त्यामुळे या रुग्णालयाच्या आवारात रुग्णासह नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यातच रुग्णालयाच्या आवारात असणारे मार्केट, पालिकेचे जी विभाग कार्यालय, श्रीराम विद्यालय असा परिसर असल्यामुळे नागरिकांची मोठया प्रमाणात रेलचेल असते. त्यामुळे नवी मुंबई महापालिका व वाहतूक विभाग यांच्या मंजुरीनंतर या रुग्णालयाच्या परिसरात नो पार्किंगचे फलकदेखील लावण्यात आले आहेत; मात्र नो पार्किंगचे फलक लावूनदेखील बिनधास्तपणे वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे नो पार्किंगचे फलक नावापुरताच उभारण्यात आला आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे; तर बेकायदा रुग्णालयाच्या आवारात पार्क करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ऐरोली, सेक्‍टर तीन येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयाच्या बाहेर पार्क करण्यात येणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात येत असते. तरीही अडथळा ठरत असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल.
-पी.ए.औटी, पोलिस निरीक्षक, रबाळे.

नवी मुंबई महापालिकेने या ठिकाणी नो पार्किंगचे फलक उभारले आहेत; मात्र वाहतूक विभागाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई या ठिकाणी होत नसल्यामुळे, वाहनचालक बिनधास्तपणे येथे वाहने पार्क करतात. त्यामुळे येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
- रामेश्वर काकडे, नागरिक.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In front of the Aeroli Hospital No parking lot just by name