राज्यातील फळांचा हंगाम लांबणीवर

राज्यातील फळांचा हंगाम लांबणीवर
राज्यातील फळांचा हंगाम लांबणीवर

नवी मुंबई : अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणची शेती पिके पाण्याखाली गेल्याने फळांची आवक आधीच घटली आहे. द्राक्षे, स्ट्रॉबेरी, अंजीर आणि आंब्यासारख्या हंगामी फळांना या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे बाजारात या फळांची आवक लांबणीवर पडली आहे. दर वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात द्राक्ष, स्ट्रॉबेरी बाजारात येण्यास सुरुवात होते; मात्र आता नवीन वर्ष उजाडेपर्यंत ही फळे बाजारात येण्याची शक्‍यता कमी आहे.

जून, जुलै महिन्यापासूनच पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात राहिल्याने बाजारात सर्व प्रकारच्या फळांची आवक नेहमीपेक्षा कमीच राहिली. त्यामुळे फळबाजारात मंदीचे वातावरण राहिले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात द्राक्ष, स्ट्रॉबेरीचा हंगाम सुरू होणे अपेक्षित होते; मात्र या वेळी अवकाळी पावसाने द्राक्षांच्या बागांना झोडपून काढले असून घडांना पाणी लागल्याने वेलींवरच द्राक्षांना तडे गेले आहेत. त्यामुळे हंगाम सुरू होऊनही बाजारात द्राक्षांची आवक सुरू झालेली नाही. एपीएमसी मार्केटमध्ये नाशिक, तासगाव, बारामती, फलटणवरून द्राक्षे येतात; मात्र परिसरात पावसाचा जोर कायम आहे. हीच परिस्थिती स्ट्रॉबेरीचीदेखील आहे. पावसामुळे स्ट्रॉबेरीची रोपेही पाण्याखाली गेली आहेत. स्ट्रॉबेरीसाठी आवश्‍यक असणाऱ्या थंडीची हवी तशी चाहूल अजून लागलेली नाही. त्यामुळे स्ट्रॉबेरीचा हंगामही लांबला आहे. बाजारात स्ट्रॉबेरीपाठोपाठ अंजिराची आवक सुरू होते. त्यालाही पावसाचा फटका बसला आहे. दर वर्षी बाजारात आंब्याची सर्वाधिक उलाढाल होते. त्यापाठोपाठ स्ट्रॉबेरी आणि द्राक्षेही असतात. डिसेंबरपासून आंब्यांची आवक बाजारात सुरू होते; मात्र आंब्याचा हंगामही या पावसामुळे लांबला आहे.

द्राक्ष, स्ट्रॉबेरीसारखी हंगामी फळे नोव्हेंबरपासून बाजारात येण्यास सुरुवात होते; मात्र या वेळी अवकाळी पावसाचा मुक्काम लांबला असल्याने द्राक्षांच्या बागांना त्याचा फटका बसला. त्यामुळे बाजारातील त्यांचे आगमनही लांबले आहे. आत्ता या फळांची आवक होणे अपेक्षित असताना ती सुरूच झालेली नाही. महिनाभर तरी ती होण्याची शक्‍यता नाही.
- आनंदा बोऱ्हाडे, व्यापारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com