"एफटीआयआय'च्या प्रवेश प्रक्रियेचे समर्थन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

मुंबई - रंगआंधळेपणा असल्यामुळे फिल्म ऍण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील (एफटीआयआय) संकलनाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश नाकारणाऱ्या विद्यार्थ्याच्या याचिकेत हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अभ्यासक्रमाच्या शर्तीनुसार व्यवस्थापन प्रवेश प्रक्रियेबाबत निर्णय घेऊ शकते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. 

"एफटीआयआय'च्या पदव्युत्तर संकलन पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी याचिकादार विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज दाखल केला होता. या अभ्यासक्रमाच्या निवडीमध्ये विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी केली जाते. या चाचणीत याचिकादार विद्यार्थ्यामध्ये सुमारे 60 टक्के रंगआंधळेपणाचा दोष असल्याचा निष्कर्ष निवड समितीने नोंदवून त्याला प्रवेश देण्यास मनाई केली. याविरोधात विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्या. एस. एस. केमकर आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. "एफटीआयआय'च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश हवा आहे, त्यामध्ये रंगआंधळेपणाचा काहीही संबंध नाही, शिवाय या आधी असा दोष असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता, असा युक्तिवाद विद्यार्थ्याच्या वतीने करण्यात आला. मात्र "एफटीआयआय'ने या युक्तिवादाचे खंडन केले. संकलनाच्या अभ्यासक्रमामध्ये रंगांची वैशिष्ट्ये आणि त्याची संगती लागणे गरजेचे आहे, त्यावर अभ्यास आणि त्याअंतर्गत उपक्रम राबविले जातात, त्यामुळे रंगांची जाण विद्यार्थ्यांमध्ये अत्यावश्‍यक आहे, असा दावा "एफटीआयआय'च्या वतीने करण्यात आला. खंडपीठाने हा दावा मान्य केला. प्रवेश प्रक्रियांबाबत निर्णय देण्यामध्ये त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मते आणि शर्ती महत्त्वाच्या असतात. न्यायालय या प्रक्रियेत सरसकट हस्तक्षेप करू शकत नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने याचिका नामंजूर केली. 

Web Title: FTII admission issue