यंदा धडामधुडूमचा बार फुसका!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

शोभेच्या फटाक्‍यांचाच लखलखाट; घरोघरी दिवाळीचा उत्साह
 

मुंबई : पणती आणि आकाशकंदिलाच्या ज्योतीने संपूर्ण मुंबई तेजोमय झाली आहे. नरक चतुर्दशी व लक्ष्मी पूजन असे दोन्ही दिवाळीचे मुहूर्त एकाच दिवशी आल्याने सकाळपासून घरोघरी उत्साहाचे वातावरण होते. दिवाळी म्हटले की फटाके व रोषणाई आलीच. पण, यंदा फटाक्‍याचा गोंगाट नेहमीपेक्षा कमी ऐकू आला. अनेक घरांमध्ये तर लहानग्यांनीच फटाक्‍यांना फाटा दिला. धडामधुडूमचा बार फुसका ठरला असून शोभेच्या फटाक्‍यांचा लखलखाटच अधिक दिसून आला.

व्यापाऱ्यांनी हिशेबाच्या चोपडीचे पूजन केल्यानंतर आणि घराघरात संध्याकाळी लक्ष्मी पूजन झाल्यानंतर दरवर्षी फटाक्‍यांचा धूमधडाका असतो. प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे फटाके फोडत असतो. मात्र, दिवाळीपूर्वी फटाक्‍यांच्या खरेदीवर मंदीचे सावट दिसत होते. व्यापारी पूर्वीपेक्षा कमी विक्री होत असल्याचे बोलत होते. लक्ष्मीपूजनानंतर फटाक्‍यांवरील मंदी दिसत होती. त्यात प्रदूषणाबाबत जनजागृतीचा हातभारही मोठा होता. आमच्या लहानपणी फटाक्‍याचे प्रचंड आकर्षण होते. दिवाळीच्या दिवसात दिवसभर लहान-मोठे फटाके वाजवायचो. पण, आताच्या पिढीला फटाक्‍यांचे फारसे आकर्षण नाही. दोन-तीन वर्षांपासून फटाक्‍यांची खरेदी कमी केली होती. यंदा तर फटाके मुलांनी विकतच घेतले नाहीत, असे वरळीतील गृहिणी माधुरी शेवडे यांनी सांगितले. यंदा आवाजाच्या फटाक्‍यांपेक्षा फुलभाजी, अनार, भुईचक्र, सेवन शॉट, टेन शॉट आदी फॅन्सी प्रकारांना पसंती होती. फॅन्सी फटाक्‍यांतून निघणारा रंगीबेरंगी धूर आणि रंगीत रोषणाई लहानांपासून मोठ्यांना आकर्षित करत आहे. 

सिद्धिविनायक, उद्यान गणेश, दादर स्वामी समर्थांचा मठ आदी परिसरात नागरिकांनी दिवाळीनिमित्त देवदर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारनंतर संध्याकाळी घरोघरी लक्ष्मी पूजनाची लगबग सुरू झाली. रांगोळी आणि पूजेचे साहित्य घेण्यात सर्वच गुंतले होते. सहकुटुंब पूजन झाल्यानंतर मुंबई संध्याकाळी खऱ्या अर्थाने दिवाळीच्या रंगात रंगून गेली. मुंबईतल्या दुकानदारांनी लक्ष्मीपूजेच्या मुहूर्तावर नवीन हिशेबाच्या वहीचे पूजन केले. दादरमधील स्वामी नारायण मंदिरात पारंपरिक पद्धतीने चोपडी पूजनाचा कार्यक्रम पार पडला. लगेच दुसऱ्या दिवशी पाडवा असल्याने संध्याकाळी मिठाईच्या दुकानात बर्फी, पेढे, बासुंदी आणि श्रीखंड घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. मित्र परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा सिलसिला रात्री उशिरापर्यंत सुरू हाेता.

सोने खरेदीवर मंदीचा परिणाम
संध्याकाळी मुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन करण्यात आले. घरोघरी लक्ष्मीची छायाचित्रे, दागदागिने, पैसे अादीचे पूजन केले गेले. मंदीची झळ असल्याने यंदा अनेकांनी  लक्ष्मी पूजनाला नवे सोने खरेदी करण्याचा मोह आवरता घेतला. मुहूर्त म्हणून १ ते ५ ग्रॅम सोन्याच्या खरेदीवर नागरिकांचा कल होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fure crackers selling in mumbai