भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

वरळी परिसरात फलकबाजी

मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे विजयी झाले. त्यानंतर ‘भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे’ असे फलक वरळी परिसरात लागले आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्यातून निवडणूक लढवणारे आदित्य हे पहिले सदस्य असल्यामुळे सुरुवातीपासूनच वरळीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण शिवसेना कामाला लागली होती. वरळीचे मावळते आमदार सुनील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले सचिन अहिर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांनी प्रचाराची धुरा सांभाळली.

या निवडणुकीत विजयी झालेले आदित्य ठाकरे यांना ८९ हजार २४८, तर पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश माने यांना २१ हजार ८२१ मते मिळाली. वरळीने यापूर्वी तीन महापौर व एक उपमहापौर दिले आहेत. आता आदित्यच्या रूपाने वरळीचा आमदार मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री बनू शकेल, असे वेध समर्थकांना लागले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर ‘शिवसेना युवा नेते भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांचे वरळी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन’, असे फलक परिसरात काही ठिकाणी लागले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Future Chief Minister Aditya Thackeray!