Gandhi Jayanti : गांधींमागे नाहीत केवळ कार्यालयातल्या भिंती!

Gandhi Jayanti : गांधींमागे नाहीत केवळ कार्यालयातल्या भिंती!

मुंबई - दीडशे वर्षांपूर्वी जन्मलेले मोहनदास करमचंद गांधी, अर्थात सर्वांचे ‘बापू’ कालातीत आहेत. भारतात रुजलेला गांधीविचार आजही जिवंत आहे आणि तो नव्या पिढीच्या बांधिलकीतून तरारून उभा राहत आहे. गांधी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नाहीत, त्यांच्या विचारांवर चालणारे उपक्रम, लोकोपयोगी कामे हीच त्यांची स्मारके ठरताहेत. ‘करके देखो’ या त्यांच्या शिकवणीनुसार काम करणारे तरुण पुढच्या पिढीत हे विचार पोहचवत आहेत!

आमटे परिवाराप्रमाणेच बंग दाम्पत्याने ‘निर्माणपर्व’ हे गडचिरोलीत सुरू केलेल्या अभियानात १० वर्षांत हजार तरुणी सहभागी झाल्या. आता ही संख्या दरवर्षी २०० ने वाढवण्यात येणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियामध्ये सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ठरलेले डॉ. अमृत बंग हे अभियान राबवतात. ‘आजही देश-विदेशात समाजकार्यात असणारा प्रत्येक जण गांधीविचार कसा अमलात आणायचा, याचाच विचार करत असतो’, असे ते म्हणतात. सुखदा लोढा ही याच उपक्रमातील तरुणी आहे. ‘नई तालीम’ या गांधीविचारानुसार तिने मालेगावात ‘आनंदबन’ बालवाडी सुरू केली. आता मेळघाटसारख्या आदिवासी भागात कुपोषण, अंधश्रद्धा, निरक्षरतेतून बाहेर पडण्यासाठी ती तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांकरिता जैन संघटनेमार्फत काम करत आहे.   

टाटा ट्रस्टच्या माध्यमातून काम करणारे डॉ. आनंद बंग म्हणतात, शतक उलटूनही गांधीजी आजही लागू होतातच. आव्हानांचे स्वरूप बदलले असेल; पण आर्थिक विषमता, वातावरणातील बदल असे नवे प्रश्‍न सोडवण्यासाठीही सत्य आणि अहिंसा याच विचारसरणीने सामोरे जावे लागणार आहे.

गांधीविचारासाठी लाखभर विद्यार्थी     
संकेत मुनोत या तरुणाने ‘नोईंग गांधीइझम ग्लोबल फ्रेण्ड्‌स’ नावाचा समुदाय तयार केला आहे. तसेच जळगावातील गांधी रिसर्च फाऊंडेशन हे युवकांमध्ये गांधी विचारांच्या प्रसाराचे काम करते. महाराष्ट्रासह आठ राज्यांत केवळ काही वर्षांत सुमारे साडेनऊ लाख विद्यार्थ्यांशी या संस्थेने संपर्क केला. गतवर्षी १५ लाख तरुणांनी गांधी विचार संस्कार परीक्षा दिली. गांधीविचार नव्या काळात स्वीकारण्याची नव्या पिढीची क्षमता लक्षणीय आहे, असे संस्थेने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com