गणेश नाईक यांनीच 'राष्ट्रवादी' संपवली - जितेंद्र आव्हाड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

पक्ष पुन्हा उभा करणार
गणेश नाईक यांनी नवी मुंबईत विकास केला, हे मान्य. मात्र, सर्व सत्ता त्यांनी कुटुंबाकडे केंद्रित केली. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे हे गणेश नाईकांचे नेतृत्व स्वीकारणार नाहीत, असे उघडपणे सांगत आहेत. आता गणेश नाईक यांचा स्वाभिमान कुठे गेला, असा सवाल करून आव्हाड यांनी पुन्हा ‘राष्ट्रवादी’ उभी करणार आणि त्याची सुरवात नवी मुंबईतूनच करणार, असा दावाही केला.

ठाणे - गणेश नाईक पक्षाची वाट लावणार, हे मी वारंवार सांगत होतो. मात्र, पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आज गणेश नाईक यांनी पद्धतशीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस संपवली आहे, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.

‘राष्ट्रवादी’ सोडून भाजपच्या वाटेवर असलेले गणेश नाईक यांना २०१४ मध्येच पक्ष सोडायचा होता. मात्र, पुढील पाच वर्षांत नाईक यांनी पूर्ण पक्षच साफ केला, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणेश नाईक आपल्या कुटुंब, कार्यकर्त्यांसह भाजपच्या वाटेवर असून, पक्षाचे सर्व नगरसेवकही भाजपच्या गोटात सामील होणार आहेत. 

या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी नाईक यांच्यावर टीका केली. २०१४ मध्ये शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू होती, तेव्हाच गणेश नाईक ‘राष्ट्रवादी’ला सोडचिठ्ठी देणार होते. ते गुप्त बैठका घेत होते. त्यांच्या या हालचालींविषयी मी पक्षाला वारंवार सूचित केले. मात्र, पक्षाने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, असा दावा त्यांनी केला.

पक्षाला खरी गरज आहे, तेव्हा हे बाहेर पडले. पक्षाने त्यांना सर्व काही दिले. मात्र, त्यांनी पक्षवाढीसाठी काहीही योगदान दिले नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला. कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा-भाईंदरमध्ये पक्षाची चांगली ताकद असतानाही ‘राष्ट्रवादी’चा एकही नगरसेवक नाही. कारण, या परिसराची जबाबदारी गणेश नाईकांकडे होती. तेव्हापासून जी फाटाफूट सुरू आहे, ती नाईकांच्याच इशाऱ्याने सुरू असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh naik NCP jitendra avahad Politics