गणेश नाईकांचे आव्हान कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

महापौर निवासस्थानी झालेल्या गणेश नाईकसमर्थक नगरसेवकांच्या बैठकीत संदीप नाईक यांच्याऐवजी गणेश नाईक यांनी ऐरोलीची उमेदवारी लढवावी, असा आग्रह यावेळी नगरसेवकांनी केला. अखेर नाईकांनी तो मान्य करीत एबी फॉर्म स्वीकारला.

नवी मुंबई : महायुतीच्या घोषणेत अडथळा ठरलेल्या बेलापूर आणि ऐरोली या दोन मतदारसंघांचा तिढा सुटला असला तरी बुधवारी (ता.२) दिवसभर विविध राजकीय घडामोडींनी नवी मुंबईतील वातावरण ढवळून निघाले. महापौर निवासस्थानी झालेल्या गणेश नाईकसमर्थक नगरसेवकांच्या बैठकीत संदीप नाईक यांच्याऐवजी गणेश नाईक यांनी ऐरोलीची उमेदवारी लढवावी, असा आग्रह यावेळी नगरसेवकांनी केला. अखेर नाईकांनी तो मान्य करीत एबी फॉर्म स्वीकारला. दुसरीकडे शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांना उमेदवारी अर्ज न दिल्याने शिवसैनिकांनी वाशीत ‘रास्ता रोको’ केला. या दोन्ही घटनांमुळे दिवसभर नवी मुंबईचे वातावरण तापले होते.   

ऐरोलीतून संदीप नाईक आणि बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना भाजपतर्फे उमेदवारी घोषित झाल्यामुळे नवी मुंबईच्या राजकीय वातावरणात काहींना अनपेक्षित आनंद झाला आहे, तर काहींचा हिरमोड झाला आहे. भाजपमध्ये आलेल्या नाईकांच्या गटात एका डोळ्यात आसू तर दुसऱ्या डोळ्यात हासू अशा काहीशा भावना निर्माण झाल्या होत्या. मात्र, गेली पाच वर्षे राजकारणातून बाहेर राहिल्यानंतर पुन्हा पुढील पाच वर्षे राजकारणातून बाहेर राहायला लागणार असल्याने नाईक समर्थकांनी पुन्हा गणेश नाईकांच्या नावाच्या घोषणा दिल्या. दिवसभर नाईकांच्या नाराजीच्या बातम्या समाजमाध्यमांवरून पसरवण्यात येत होत्या. अखेर महापौर निवासस्थानी ५६ नाईक समर्थकांची बैठक पार पडली. या बैठकीत संदीप नाईक यांच्याऐवजी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर गणेश नाईक यांनी ऐरोली मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला. या निर्णयामुळे नाईक आता त्यांच्या पारंपरिक मतदारसंघाऐवजी शिवसेनेचे प्राबल्य अधिक असणाऱ्या ऐरोली मतदारसंघातून लढणार असल्याने नाईकांची मदार पुन्हा शिवसेनेवर येऊन ठेपली आहे. 

शिवसेना मदत करणार?
नवी मुंबईतील १११ नगरसेवकांपैकी सर्वाधिक नगरसेवक ऐरोली मतदारसंघातून आहेत. या मतदारसंघातून शिवसेनेच्या जागेवर २६ नगरसेवक आहेत. भाजपचे २, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाईक समर्थक २०, काँग्रेसचे ३ आणि अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल आहे. यापैकी नाईक समर्थकांचे आकडे पाहिले तर ते २५ च्या घरात जात असून, त्यापेक्षा जास्त नगरसेवक शिवसेनेकडे आहेत. मात्र, शिवसेनेसोबत नाईकांचे मनोमिलन झाले नसल्याने मदतीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. नगरसेवक एम. के. मढवी कुटुंबीयांचा नाईकांसोबतचा वाद पाहता निवडणुकीत युतीधर्म पाळण्याची शक्‍यता धूसर असल्याचे बोलले जात आहे. 

मंदा म्हात्रे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
भाजपतर्फे आमदार मंदा म्हात्रे आज दुपारी कोकण भवनमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. यादरम्यान कोणत्याही प्रकारचे शक्तिप्रदर्शन न करता साध्या पद्धतीने अर्ज भरला जाणार असल्याचे मंदा म्हात्रे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे नगरसेवक अशोक गावडे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. माजी मंत्री गणेश नाईक शुक्रवारी (ता.४) उमेदवारी अर्ज भरणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Naik's challenge persisted