
Ganeshotsav 2022: मुंबईकरांनो Whatsapp वर घ्या गणपती मूर्ती विसर्जन स्थळाची माहिती
मुंबईकरांचे गणपती विसर्जन सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने व्हॉट्सॲप चॅटबॉट ही सेवा सुरू केली आहे. या व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवेमार्फत मुंबईकर आता क्यूआर कोड स्कॅन करून किंवा बीएमसीने दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्यांच्या घराजवळील गणेश मूर्ती विसर्जन स्थळाची माहिती मिळवू शकतात. तसेच आता मुंबईकरांना बाप्पांच्या विसर्जनासाठी पायपीट करावी लागणार नाही. एका क्लीकवर गणेश मूर्ती विसर्जन स्थळाची माहिती जाणून घेऊ शकतात.
बीएमसीने शहरातील उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मोठी तयारी केली आहे. 31 ऑगस्टपासून 10 दिवसांचा गणेशोत्सव सुरू झाला असून प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यासाठी नागरी संस्थेने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तर मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील कृत्रिम तलावांची यादी जाहीर केली आहे, जेणेकरून नागरिक तिथे आपल्या घरातील गणेश मुर्त्यांचे विसर्जन करू शकतील. दरवर्षी, नागरी संस्था मूर्ती विसर्जनासाठी तात्पुरते कृत्रिम तलाव बांधले जातात.
दोन वर्षांनंतर कोविड-19 चे निर्बंध उठल्यानंतरचा हा पहिलाच गणेश उत्सव आहे. विशेष बाब म्हणजे, नागरी संस्थेने यंदा पीओपी निर्मित गणेश मूर्ती वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे लागणार आहे.