गणेशोत्सवासाठी एसटीच्या २,२०० जादा बसगाड्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

गणेशोत्सवादरम्यान २ हजार २०० जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या बसगाड्यांचे आरक्षण २७ जुलैपासून सुरू होईल.

मुंबई  - गणेशोत्सवादरम्यान २ हजार २०० जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या बसगाड्यांचे आरक्षण २७ जुलैपासून सुरू होईल. 

मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांची गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी गर्दी उसळते. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळ कोकणात २ हजार २०० जादा बसगाड्या सोडणार आहे, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. गणेशोत्सवासाठी पहिल्या टप्प्यात २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात जादा बसगाड्या सोडल्या जातील. या बसगाड्यांची आगाऊ तिकीटविक्री २७ जुलैपासून सुरू होणार आहे. चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे संगणकीय आरक्षणही २७ जुलैपासूनच करता येईल. 

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गटागटाने बसगाड्या आरक्षित करतात. उपनगरांतील रहिवाशांना एकत्र येऊन एकाच गावाकडे अथवा पंचक्रोशीतील गावांकडे जाण्यासाठी एसटी बस आरक्षित करणे सोईचे ठरते. या ग्रुप बुकिंगला (गट आरक्षण) शनिवारपासून (ता. २०) सुरवात होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav 2200 ST Konkan diwakar raote