बँकेतील 'ती' हुशारी पडली महागात !

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

हातचलाखी करून ते दोघे पसार होण्यापूर्वी सुरक्षा रक्षकाने दोघांना ताब्यात घेतले. दोघांची तपासणी केली असता 2 हजार रुपयांच्या 40 नोटा त्या दोघांकडे मिळून आल्या.

मुंबई : आकर्षक क्रमांकाच्या नोटांचा बहाणा करून बॅंकेत हातचलाखी करणाऱ्या दुकलीला खार पोलिसांनी गजाआड केले. फिरोज फैय्याज खान आणि मजलूम गुलाम इराणी अशी दोघांची नावे आहेत. दोघांकडून 80 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. न्यायालयाने त्या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

फिरोज आणि मजलूम हे ठाण्याचे रहिवासी आहेत. शुक्रवारी (ता.13) ते दोघे खार पश्‍चिम येथील एका खासगी बॅंकेत गेले. बॅंकेच्या एटीएममधून दोघांनी काही रक्कम काढली. रक्कम काढल्यानंतर ते बॅंकेत गेले. तेथील कॅशियरला आकर्षक क्रमांकाच्या नोटा हव्या आहेत, अशा भूलथापा मारल्या. कॅशियरने विश्‍वास ठेवत 2 हजार रुपयांचे बंडल त्या दोघांकडे दिले. त्यानंतर कॅशियर कामात व्यस्त झाल्या. याचाच फायदा फिरोजने घेतला. हातचलाखी करून फिरोजने त्या 2 हजाराच्या बंडलमधील 40 नोटा काढल्या. नोटा काढल्यानंतर ते बंडल पुन्हा कॅशियरकडे दिले. कॅशियरला त्या बंडलमधील नोटा कमी असल्याचा संशय आल्यामुळे तिने याबाबत बॅंकेत सुरक्षा रक्षकाला माहिती दिली. 

हातचलाखी करून ते दोघे पसार होण्यापूर्वी सुरक्षा रक्षकाने दोघांना ताब्यात घेतले. दोघांची तपासणी केली असता 2 हजार रुपयांच्या 40 नोटा त्या दोघांकडे मिळून आल्या. कॅशियरने घडल्याप्रकाराची माहिती खार पोलिसांना कळवली. खार पोलिस काही वेळात बॅंकेत पोहचले. बॅंकेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी फिरोज आणि मजलूमला अटक केली. त्या दोघांची पोलिस कसून चौकशी करत आहेत. 
 

 
 

Web Title: The gang that switches the notes of the fascinating numbers arrested

टॅग्स